
कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेलेलं आहे. हिंदुस्थानातही या व्हायरसने शिरकाव केला असून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील दीडशे हून अधिक देशांमध्ये हा व्हायरस पसरला असून याची लागण झपाट्याने होत आहे.
थायलंड या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशात देखील कोरोना पसरला असून आतापर्यंत या देशात 82 जणांना या आजाराची लागण झाली आहे. यात 11 मित्रांचा देखील समावेश आहे. या मित्रांनी गेल्या आठवड्यात एकत्र बसून दारूची पार्टी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यातील काही जणांना सर्दी खोकला ताप अशी कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्या अकराही मित्रांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता ते ज्या बारमध्ये बसून दारू प्यायले होते तेथील स्टाफ तसेच या सर्व मित्रांच्या कुटुंबीयांच्या देखील चाचण्या केल्या जात आहेत. थायलंडच्या आरोग्य विभागाने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. थायलंडमध्ये देखील कोरोना पसरू नये म्हणून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्य़ात आली आहे. बार रेस्टॉरंट, क्लब, मॉल, सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रसार हे चीनचे पाप
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रसारामागे चीनच्या सरकारचे पाप आहे, ही बाब आता उघड होत आहे. चीनच्या एका महिला डॉक्टरच्या मुलाखतीनंतर समोर आली आहे. 15 डिसेंबर 2019 च्या सुमारास या व्हायरस संदर्भातील पहिला रुग्ण वुहान येथे समोर आला. त्या रुग्णावर उपचार करताना हा नवीन प्रकारचा जीवघेणा व्हायरस असून वेगाने संक्रमित होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती चीनच्या सरकारी विभागाला कळवून याप्रकरणी त्वरित उपया करण्यासाठी पाऊले उचलावी लागतील अशी माहिती दिली. मात्र चीनचे सरकार आणि अधिकाऱ्यांनी ही माहिती उघड करू नये अशी धमकी दिली. चीनच्या सरकारने तेव्हाच ही माहिती उघड करून खबरदारीच्या उपाय योजना केल्या असत्या तर कोरोनोला वेळीच रोखता आले असते असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
























































