नांदेडमधून 5 कोटींचा गांजा जप्त, तीन दिवसांपासून लावली होती फिल्डिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने नांदेडमध्ये कारवाई करून सुमारे 1 हजार 127 किलो गांजा जप्त केला. गांजा तस्करी प्रकरणी दोघांना एनसीबीने अटक केली. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 5 कोटी असून यंदाच्या वर्षातील एनसीबी मुंबई युनिटची ही मोठी कारवाई आहे.

नववर्षाच्या अनुषंगाने राज्यात ड्रग्ज तस्करीचे प्रकार होऊ नयेत म्हणून याची खबरदारी एनसीबीने घेतली आहे. आंध्र प्रदेश येथून एका भंगाराच्या ट्रकमधून महाराष्ट्रात गांजा आणला जाणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकातील अमोल मोरे, सुधाकर शिंदे यांच्या पथकाने तीन दिवसांपासून नांदेड येथे फिल्डिंग लावली होती. आज सकाळी नांदेडच्या एका गावात भंगाराचा ट्रक आला होता. एनसीबीच्या अधिकाऱयाने त्या ट्रकची तपासणी केली. तेव्हा त्या भंगाराच्या ट्रकमध्ये लोखंडी सळईच्या गोणी दिसल्या. त्या गोणीच्या आत गांजा लवपला होता. एनसीबीने 44 गोणी जप्त केल्या आहेत.

गांजा तस्करी प्रकरणी एनसीबी मुंबई युनिटने गेल्या अकरा महिन्यांत 107 केसेस केल्या असून 227 जणांना अटक केली आहे. त्यात 37 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. 101. 5 ग्रॅम कोकेन, 41 किलो चरस, 318 किलो गांजा, 8 किलो हेरॉईन, 10 किलो एफेड्रीन, 4.5 किलो मेथामाईन, एलएसडी 21 ग्रॅम जप्त केले आहे.

नक्षलवादी कनेक्शन तपासणार

एनसीबीने जप्त केलेला तो गांजा आंध्र प्रदेश येथून आला होता. आंध्र प्रदेशच्या नक्षलवादी भागातून आलेला तो गांजा महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाठवला जाणार होता. गांजाच्या नक्षली कनेक्शनचा तपास आता एनसीबी करणार आहे.