
शाळेत जाणारा 13 वर्षीय मुलगा टेक कंपनी चालवत आहे. ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र वाटते. पण या गोष्टीवरून शाळेने मुलाच्या खासगी आयुष्याबद्दल शोध घेण्यास सुरूवात केली. या 13 वर्षीय विद्यार्थ्याने तो एका इंटरनेट टेक्नोलॉजी कंपनीचा मालक असल्याचा दावा केला आहे. तसेच त्याच्या हाताखाली 5 ते 6 कर्माचारी काम करत असून तो त्यांना पगार ही देत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. या गोष्टीचा उलगडा शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिलेल्या निबंध लेखनामुळे झाला आहे.
चीन मधील एका शाळेत हा अचंबित करणारा प्रकार घडला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, शाळेतील मुलांना आपल्या यशस्वी वर्गमित्रावर निबंध लिहिण्यास सांगितला होता. तेव्हा काही मुलांनी या विद्यार्थ्याबद्दल निबंध लिहिला. मात्र चीनमध्ये 18 वर्षांखालील मुलांना कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अथवा नोकरी करण्यास मनाई आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांच्यामते हा मुलगा नक्कीच कोणत्याही कंपनीचा मालक नसू शकतो, कारण कायदेशीररित्या कंपनी चालविण्यास देशात बंदी आहे, असे म्हटले आहे.
याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्याला विचारतात तुझी कोणती कंपनी आहे? त्यावर इंटरनेट टेक्नोलॉजीची कंपनी असल्याचे त्याने सागिंतले. त्याचबरोबर त्याचा हाताखाली 5 ते 6 माणसे काम करत असून त्यांना पगार देत असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या उत्तरावर व्हिडीओ बनविणाऱ्या शिक्षकाने त्याचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊस पडत आहे.

























































