
पंढरपूर परिषदेत करवसुलीसाठी नियुक्त केलेल्या दोन शिपायांनी 14 लाख 50 हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. नागरिकांकडून जमा केलेला कर तिजोरीत जमा न करता परस्पर लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी कर विभागाकडून या दोन कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. आदित्य लोखंडे आणि स्वप्नील नेहतराव अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱयांची नावे आहेत.
पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱयांकडून शहरात मालमत्ताकराची वसुली करण्यात येते. करवसुली झाल्यानंतर प्रत्यक्षात कर जमा करून रेकॉर्डसह पैसे तिजोरीत भरले जातात. मात्र, झोपडपट्टी शुल्क वसुलीसाठी मुख्याधिकाऱयांनी आदित्य लोखंडे आणि स्वप्नील नेहतराव या दोन शिपायांची विशेष लिपिक म्हणून 2019 मध्ये नेमणूक केली होती. सलग चार वर्षे या दोघांनी सेवा शुल्क वसूल केले; परंतु प्रत्यक्षात कर जमा होऊन रेकॉर्डसह पैसे तिजोरीत जमा न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आदित्य लोखंडे याने 2 लाख 56 हजार 139 रुपये, तर स्वप्नील नेहतराव याने 11 लाख 95 रुपयांपेक्षा जास्त अपहार केल्याचे समोर आले आहे.
करवसूल केला; परंतु त्याचे पावतीपुस्तक व पैसे जमा केले नाहीत. आदित्य लोखंडे याने 2 लाख 56 हजार 139 रुपये, तर स्वप्नील नेहतराव याने 11 लाख 95 हजार असा सुमारे 14 लाख 56 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी या दोघांनाही निलंबित केले आहे. पैसे न भरल्यास कायदेशीर कारवाई करू.
– बाळासाहेब कांबळे, कर विभागप्रमुख , पंढरपूर नगरपरिषद.





























































