दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत पंधरा जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर, ब्राम्हणी या ३ ठिकाणी दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत तब्बल पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेक मोटर सायकलची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. जखमींना उपचारासाठी राहुरीचे ग्रामीण रूग्णाल्य तसेच खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

पहिली घटना राहुरी फॅक्टरी येथील पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी रात्री घडली. मागील भांडणाच्या कारणावरून वादाला तोंड फुटून राहुरी व राहुरी फॅक्टरी येथील तरूणाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत तीघे जखमी झाले आहेत. हाणामारीची दुसरी घटना तालुक्यातील ब्राम्हणी येथे आज शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. जमीनीच्या वादातुन दोन गटातील तरूण समोरासमोर आले. यावेळी तरूणांचे दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडल्याने तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत ९ ते १० मोटारसायकलींचे मोठ्या प्रमाणात नूकसान करण्यात आले आहे.

ब्राम्हणी येथील हाणामारीत श्रीकांत नालकर, सोमनाथ भागवत दोघे राहणार देवळाली प्रवरा, राजू गायकवाड राहणार उंबरे, जाकिर पठाण राहणार करजगांव हे जखमी झाले आहेत. दासू पठारे या जखमी तरूणास नगर येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तिसरी घटना आज सकाळी बारागाव नांदूर येथील दावल मलिक दर्गा असलेल्या बनात घडली.दोन गटात हाणामारी होऊन बाबूभाई गुलाब इनामदार व रफिक उस्मान इनामदार यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहे. राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर व ब्राम्हणी या तिन्ही गावात झालेल्या हाणामारीत लाकडी दांडे, गज व काठ्यांचा वापर करण्यात आला. या घटने प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी देण्यासाठी तीन्ही गावातील मोठा जमाव आज दुपारी राहुरी पोलीस स्टेशनला जमा झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. राहुरी फॅक्टरी येथील हाणामारी घटनेचा परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ब्राम्हणी व बारागाव नांदुर हाणामारीचे गुन्हे दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

एकाच दिवसात जबर हाणामारीच्या लागोपाठ तीन घटना घडल्याने राहुरीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचे स्पष्ट झाले आहे.