फेरफटका मारायला, सेल्फी काढायला आणि बचाव कार्य पाहायला! किमान 15 हजार ‘बघे’ इर्शाळवाडीला पोहोचले

रायगडातील इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून दुर्घटना घडली. बुधवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर आजपर्यंत किमान 15 हजार जण ‘काय चाललंय’ बघण्यासाठी आले होते. या बघ्यांना आवर घालण्यात येत नसल्याने त्यातले काहीजण थेट बचावकार्य सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचले. यातल्या परिस्थितीचे गांभीर्य नसलेल्या काहींनी दुर्घटनेच्या ठिकाणी सेल्फी काढले. या बघ्यांमुळे पोलिसांना आणि बचाव कार्यात गुंतलेल्या जवानांना मनस्ताप होत आहे. गर्दी करू नका अशा वारंवार सूचना दिल्यानंतरही घटना स्थळी आणि पायथ्याशी बघ्यांची गर्दी कमी होत नाहीये. शुक्रवारपासून या बघ्यांना आवरण्यास प्रशासनाने सुरूवात केली.

नामाराचीवाडी आणि नाणिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौक ग्राम पंचायत सदस्यांनी पोलिसांच्या उपस्थितीतच बघ्यांना मोठ्या संख्येने सोडलं असा आरोप केला जात आहे. यातले काही जण घटनास्थळापर्यंत पोहोचले होते. इर्शाळवाडीत घटनास्थळी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण केंद्राला गर्दी करू नका अशा वारंवार सूचना द्याव्या लागत होत्या. या बघ्यांमुळे एनडीआरएफ, डॉक्टर आणि सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांना अडथळा निर्माण होत होता. घटनास्थळापर्यंत जाण्यासाठी 4 किलोमीटरचा रस्ता असून इथे हे बघे ठिकठिकाणी उभे राहून सेल्फी घेत होते.

इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीखाली दबलेल्यांना बाहेर काढणाऱया एनडीआरएफच्या जवानांसमोर निसर्गाच्या रौद्ररूपाचे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणारा धुवांधार पाऊस, दाट धुके, पाण्याचे प्रचंड लोट आणि वेगाने वाहून येणारा चिखल, मातीचा राडारोडा यांच्याशी सामना करत एनडीआरएफचे बचावकार्य अद्यापही सुरू आहे. चिखल, मातीचा ढिगारा उपसल्यानंतर त्यात वरून वेगाने येणारे पावसाचे पाणी साचत असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे निर्माण झाले असून आता परिसरात दबलेल्या मृतदेहांची दुर्गंधी पसरू लागली आहे. शुक्रवारी आणखी सहा मृतदेह सापडल्याने बळींचा आकडा 22वर पोहोचला असून अजूनही अनेकजण ढिगाऱयाखाली असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

इर्शाळगडाच्या कुशीत असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेत 25 घरे व 120 गावकरी त्याखाली गाडले गेले. एनडीआरएफ, टीडीआरएफ व सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी बचावकार्य सुरू केले. इर्शाळवाडी अत्यंत दुर्गम डोंगरात असल्याने पहिल्या दिवशी तेथे कोणतीही यंत्रे पोहोचू शकली नाहीत.

प्रांताधिकारी अजित नैराळे, खालापूरचे तहसीलदार अयुब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूरचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य पथकाची टीम नियोजन आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहे.

दरड, माती दूर केली की त्यात पाण्याचे लोट घुसायचे
धुवांधार पावसाचा मारा, दहा फुटांवरचेही दिसणार नाही इतके दाट धुके, गडावरून धबधब्यासारखे येणारे पाण्याचे लोट आणि त्याबरोबर वाहून येणारा चिखल, मातीचा राडारोडा या अडथळय़ांचा सामना बचाव पथकाला करावा लागत होता. 20 फूट दरडींखाली दबलेल्या घरांमधील गावकऱयांचा शोध घेणे दुरापास्त झाले होते. दरड आणि चिखल, माती फावडय़ाने दूर केली की तिथे होणाऱया खड्डय़ांमध्ये वरून येणारे पाण्याचे लोट साचत होते. ते पाणी काढून पुन्हा खड्डा केला की त्यात पुन्हा पाण्याचे डबके तयार होत असल्याने बचाव पथकाचा कस लागत होता.