
सामना ऑनलाईन । मुंबई
उपनगरीय लोकलच्या तिन्ही मार्गांवर एकाच दिवशी विविध अपघातांत एका महिलेसह तब्बल 16 जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईत उपनगरीय लोकल अपघातांत दररोज सरासरी आठ ते दहाजणांचा मृत्यू होत असतो. गेल्या काही महिन्यांतील एकाच दिवशी इतक्या मोठय़ा संख्येने बळी गेल्याची ही पहिलीच घटना आहे.
गुरुवारी 18 जुलै रोजी दिवसभरात 16 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. ठाणे आणि कुर्ला रेल्वे स्थानकात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला असून कल्याण आणि डोंबिवलीत प्रत्येकी दोघांचा, तर वाशी, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली आणि वसई येथे प्रत्येकी एकाचा अपघातात बळी गेला असल्याची आकडेवारी लोहमार्ग पोलिसांनी जाहीर केली. उपनगरीय मार्गावर दररोज 80 लाख प्रवासी प्रवास करीत असून रूळ ओलांडताना, चालती गाडी पकडताना किंवा गर्दीमुळे दारात लटकणाऱ्या सरासरी 8 ते 10 प्रवाशांचा दररोज बळी जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
























































