हॉकीत हिंदुस्थानचा धडाकेबाज श्रीगणेशा; उझबेकिस्तानविरुद्ध 16 गोल

हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी आपल्या मोहिमेचा धडाकेबाज श्रीगणेशा केला. त्यांनी दुबळ्या उझबेकिस्तानविरुद्ध दे दणादण 16 गोल ठोकून त्यांना चांगलेच हॉकीचे धडे शिकविले. उझबेकिस्तानची कामगिरी एवढी सुमार झाली की, त्यांना एकही गोल करता आला नाही.

हिंदुस्थानकडून ललित उपाध्यायने सर्वाधिक चार गोल केले. याचबरोबर वरुण कुमार आणि मनदीप सिंग यांनी 3-3 गोल ठोकले. आता मंगळवारी पुढील सामन्यात हिंदुस्थानची गाठ सिंगापूरशी पडणार आहे. उझबेकिस्तानविरुद्ध ललित कुमार उपाध्यायने सामन्याच्या सातव्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानचे खाते उघडले. मग वरुण कुमारने ड्रग फ्लिकचे गोलमध्ये रूपांतर करून हिंदुस्थानची आघाडी 2-0 ने वाढविली. दुसऱया क्वार्टरमध्ये दुसऱ्याच मिनिटाला अभिषेकने गोल केला. पुढच्याच मिनिटाला मनदीप सिंगने उत्कृष्ट पास गोलपोस्टमध्ये पाठवून हिंदुस्थानची आघाडी 4-0 केली. 24 व्या मिनिटाला ललित कुमार उपाध्यायने आणखी एक गोल करत संघाची गोलसंख्या 5-0 अशी नेली. मनदीप सिंगने 27 व्या आणि 28 व्या मिनिटाला दोन बॅक टू बॅक गोल करत केले. त्यामुळे हिंदुस्थानने मध्यंतरापर्यंतच 7-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती. दुसऱ्या हाफमध्येही उझबेकिस्तानच्या खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळाली नाही, मात्र हिंदुस्थानकडून दुसऱ्या बाजूने गोल होतच राहिल्याने हिंदुस्थानने उझबेकिस्तानचा 16-0 गोलफरकाने धुव्वा उडविला.