
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मुळा धरणात अवघा 16 टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून सिंचनासाठी दिले जाणारे उन्हाळी आवर्तन यंदा अशक्य आहे. धरणात असलेला पाणीसाठा पिण्यासाठी राखीव असला तरी पाणी कपातीचे संकट कायम आहे.
जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाची साठवण क्षमता 26 हजार दशलक्ष घनफुट (26 टिएमसी) आहे. धरणात 4 हजार 500 दशलक्ष घनफुट (4.5 टिएमसी) मृतसाठा असून उर्वरीत 21 हजार 500 एवढाच साठा उपयुक्त अथवा वापरयोग्य आहे. यंदा मुळा धरणातून दोनवेळा सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. पिण्याच्या पाण्यासाठी विविध पाणीवापर संस्था, कारखाने, महापालिका आदी योजनांचे पाणीआरक्षण निश्चित करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी जुलैअखेर पुरेल एवढे पाण राखीव आहे.
सद्यस्थितीत धरणात 3 हजार 446 दशलक्ष घनफुट एवढाच उपयुक्त पाणीसाठी शिल्लक आहे. हे प्रमाण एकूण साठ्याच्या अवघ्या 16.2 टक्के आहे. जुलैनंतर पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. धरणातून यापूर्वी शेती सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन देण्यात आले होते. परंतु, यंदा 1 नोव्हेंबरला धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले होते. त्यानुसार पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन केले आहे.
पाणी योजनांमुळे दुष्काळी भागात टँकर भरण्यासाठी उद्भव उपलब्ध झाले आहेत. धरणात राहिलेला अत्यल्प पाणीसाठा जिल्ह्याची चिंता वाढवणारा आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या पिण्याची पाणी, चारा असे संकट जिल्ह्यासमोर उभे आहे. जिल्ह्यात 13 तालुक्यांमध्ये सुमारे 9 लाख लोकसंख्येला 535 टँकरने पाणीपुरवठा सुरू केले आहेत. आवश्यकतेनुसार छावण्यांचे प्रस्ताव आल्यानंतर तपासणी करूनच मंजुरी दिली जात आहे. बहुतेक ठिकाणी चारा डेपोचीही मागणी केली जात आहे.
पाणी जपून वापरा
‘आम्ही 31 जुलैपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल अशा पद्धतीचे नियोजन करून पाणी आरक्षीत केलेले आहे. सद्यस्थितीत लाभक्षेत्रातूनही पाण्याची मागणी आहे. परंतु, मनपा, नगरपालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा’, असे आवाहन कार्यकारी अभियंते रावसाहेब मोरे
यांनी केले आहे.

























































