
सामना ऑनलाईन, जम्मू
पाकडय़ांच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. त्यांचे नापाक इरादे ते आणखी मजबूत करत असल्याचे उघड झाले आहे. सातत्याने शस्त्र्ासंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकडय़ांनी आणखी खतरनाक खेळी खेळण्याची तयारी सुरू केली आहे. जम्मू-कश्मीरात सध्या मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी होत असून त्याचाच फायदा घेऊन नियंत्रण रेषेजवळ तब्बल 160 दहशतवादी हिंदुस्थानात घुसण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ हिंदुस्थानी लष्कराकडून हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
पाकडय़ांनी नियंत्रण रेषेजवळ 160 दहशतवादी तयारच ठेवले आहेत. त्यांना केवळ एक संधी मिळण्याची देरी आहे, असे हिंदुस्थानी लष्करातील एका अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तान जेव्हा असे नापाक इरादे ठेवणार नाही, ते तेव्हा आपली नीती बदलतील तेव्हाच सीमेपलीकडच्या या दहशतवादाला लगाम घालता येईल असे मत नगोटा स्थित व्हाइट नाइट कोरचे जनरल कमांडिंग अधिकारी लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी मांडले.
बर्फाळ प्रदेशातून घुसखोरी
जम्मू-कश्मीरमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. याचाच फायदा घेऊन बर्फाळ प्रदेशातून दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात, मात्र अचानक आलेल्या संकटाशी मुकाबला करण्याची तयारी हिंदुस्थानी लष्कराने ठेवली आहे. सुरक्षा संस्थांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत, असे लेफ्टनंट जनरल सिंह यांनी सांगितले.
हिंदुस्थानी लष्कर उत्तर देण्याच्या तयारीत
हिंदुस्थानी लष्करानेही दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्याची तयारी ठेवली असल्याचे 2016 मध्ये पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानातून वेगवेगळय़ा ठिकाणांहून 140 ते 160 दहशतवादी हिंदुस्थानात घुसण्याच्या तयारीत असल्याचे लेफ्टनंट जनरल सिंह यांनी सांगितले.
गोळीबाराची सुरुवात पाकडे करतात
सीमेपलीकडून सातत्याने शस्त्र्ासंधीचे उल्लंघन होते. आम्ही कधीही गोळीबाराला सुरुवात करत नाही. त्यांच्याकडून कधीही गोळीबार होतो. पण त्याला आमच्याकडूनही चोख उत्तर दिले जाते असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच नियंत्रण रेषेवर आमच्यासाठी कुठलाही संघर्षविराम नाही. आम्हाला नेहमीच तयार राहावे लागते, असेही अधिकारी म्हणाले.
कुपवाडामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान
कुपवाडा जिह्यात रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांची एका दहशतवाद्याशी चकमक उडाली. यादरम्यान जवानांनी या दहशतवाद्याला कंठस्नान घातले. हंदवाडाजवळ दहशतवाद्यांकडून पोलिसांच्या तळावर गोळीबार सुरू झाल्यानंतर ही चकमक उडाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

























































