
बीट मार्शल हवालदार मनोहर पाटील आणि किशोर कर्डीले यांना त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गौरवण्यात आले आहे. पाटील आणि कर्डीले यांनी अपघातग्रस्त स्कूटर मध्ये सापडलेले 4 लाख प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. 12 मे रोजी एक वृद्ध जोडपे हज यात्रेसाठी 4 लाख रोख स्वरूपात घेऊन स्कूटरवरून आपल्या घरी निघाले होते. यावेळी त्यांचा मुंब्रा- पनवेल मार्गावर अपघात झाला.
पाटील आणि कर्डीले यांना या अपघाताची वायरलेसवर माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमी खलील शेख (65) आणि फरहात शेख (60) या जोडप्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. मृतांची ओळख पटावी यासाठी घटनास्थळी अपघातग्रस्त स्कूटरमध्ये कागदपत्र शोधात असताना या दोघांना सिटखालील डिक्कीमध्ये 4 लाख रुपये आढळून आले.
यावेळी त्यांनी ही रोख रक्कम तळोजा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्याकडे सोपवली. यानंतर सोनावणे यांनी शहानिशा करून ही रक्कम अपघातग्रस्त जोडप्याच्या मुलाकडे सोपवली. पाटील आणि कर्डीले यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचा झोन 2 चे सहाय्यक पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान वृद्ध जोडप्याच्या अपघातास कारणीभूत असणाऱ्या कंटेनरच्या चालकास पोलिसांनी अटक केली आहे.




























































