
शाळेची इमारत अनधिकृत असल्याची खोटी तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया माहिती अधिकार कार्यकर्त्यांना 15 लाख रुपये स्वीकारताना ठाणे पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. राजवीर राजपूत आणि नारायण शर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी पाचपाखाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात असलेल्या ‘सेंट झेविअर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ या शाळेची इमारत अनधिकृत असल्याचा खोटा दावा केला होता. या संदर्भात त्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे तक्रारही दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी आणि शाळेवर होणारी पालिकेची कारवाई रोखण्यासाठी आरोपींनी शाळा प्रशासनाकडे सुरुवातीला 25 लाख रुपयांची मागणी केली होती.
शाळा प्रशासनाने आरोपींशी कायदेशीर मार्ग काढण्याच्या उद्देशाने बोलणी सुरू ठेवली आणि ही रक्कम 15 लाख रुपयांवर आणली. दरम्यान, शाळा प्रशासनाने तात्काळ या ब्लॅकमेलिंगची माहिती ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला दिली. तक्रार मिळताच पोलिसांनी गुरुवारी पाचपाखाडी परिसरात सापळा रचला.
ठरलेल्या नियोजनानुसार, शाळा प्रशासनाकडून 15 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी राजवीर राजपूत आणि नारायण शर्मा या दोन्ही तोतया कार्यकर्त्यांना रंगेहात बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरोधात भादविच्या कलम 308(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी स्वतःला आरटीआय कार्यकर्ते सांगून इतर संस्थांनाही धमकावत होते का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
































































