पुण्यात वाहनचोरी करणाऱ्या दोघांना बेड्या, चोरीच्या चार दुचाकी जप्त

शहर परिसरात वाहनचोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून हडपसर, लोणी काळभोर, चतु:र्श्रुंगी आणि दिघी पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

आतिश किसन जाधव (वय 19, रा. चंदवाडी, फुरसुंगी), आदित्य अविनाश खोमणे (वय 19 ,रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहर परिसरात वाहनचोरीच्या घटनांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे पोलीसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. त्यानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे अधिकारी व अंमलदार शनिवारी हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान हडपसरमधील जुन्या कॅनॉल लगतच्या रस्त्यावर दोघेजण संशयितरित्या थांबले असून त्यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल सरतापे, विनायक येवले यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी शहर परिसरात वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

या आरोपींकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी त्यांना हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विवेक पाडवी, अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे, विनायक येवले, संदीप येळे ,राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.