
सामना प्रतिनिधी । मुंबई
विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी कमी करण्याबरोबरच नागरिकांना प्रखर प्रकाश देण्यासाठी राज्य सरकार आणि ‘ईईएसएल’ या कंपनीने कंबर कसली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ३९४ स्थानिक स्वराज्य संस्थांचे रस्ते तब्बल २० लाख एलईडी दिव्यांनी (ऊर्जा कार्यक्षम दिवे)चकाकणार आहेत. सध्याच्या जादा वीज खाणाऱ्या पथदिव्यांऐवजी विजेची बचत करणारे एलईडी दिवे बसवण्याबाबत सरकार आणि ईईएसएलने योजना अखली असून त्याची सुरुवात यवतमाळ जिह्यातून होणार आहे.
सध्या महाराष्ट्रासह देशाची विजेची मागणी झपाटय़ाने वाढत आहे. ती पूर्ण करण्यासाठी कोळशावरील वीज प्रकल्पांमधून ७० टक्के वीज घ्यावी लागत असल्याने हवेतील प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. तसेच अपुऱ्या कोळशामुळेही अनेकदा वीजनिर्मितीवर मर्यादा येतात. त्या पार्श्वभूमीवर सरकार ईईएसएलच्या सहकार्याने देशभर कमी विजेवर चालणारी उपकरणे, दिवे बसवत आहे. केंद्राच्या राष्ट्रीय पथदिवे योजनेंतर्गत (एसएलएनपी) पुढील सहा महिन्यांत हे पथदिवे बसवण्यात येणार असून त्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. तसेच या पथदिव्यांची देखभाल आणि दुरुस्ती ईईएसएल पुढील सात वर्षे करणार आहे. दरम्यान यवतमाळ जिह्यातील १६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रस्त्यावर हे पथदिवे बसवण्याबाबत नुकताच ईईएसएल आणि संबंधित संस्थांमध्ये करार झाला आहे.
वीज बिल बचतीतून मिळणार परतावा
विजेच्या बचतीसाठी ऊर्जा कार्यक्षम पथदिवे बसवण्याचा संपूर्ण खर्च ईईएसएल करणार आहे. या पथदिव्यांमुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मासिक वीज बिलात मोठी बचत होणार आहे. ही बचत होणारी रक्कम ईईएसएलला परतावा रूपाने टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. तसेच या दिव्यांमुळे देखभाल दुरुस्तीचा खर्चही कमी होणार आहे.
























































