
मालमत्ता कर थकबाकीदारांना पालिकेने 21 दिवसांची मुदत देत नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. या मुदतीत थकीत कर भरला नाही तर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, आर्थिक वर्षात 3 हजार 700 कोटी रुपयांची वसुली केली आहे.
पालिकेला या वर्षी मालमत्ता करातून 5 हजार 135 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने पालिकेने थकबाकीदारांकडून वेगाने वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चअखेरपर्यंत पालिकेला 1 हजार 435 कोटी रुपयांची वसुली करायची आहे. त्यामुळे पालिका आता 21 दिवसांची नोटीस पाठवत आहे. गेल्या वर्षी तब्बल 11 हजार 661 मालमत्ता जत करण्यात आल्या. यात हेलिकॉप्टरपासून भूखंड, गाळे, वाहने, संगणक, महागडय़ा उपकरणांचाही समावेश आहे. यंदाही महानगरपालिकेने थकबाकीदारांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे.
बडे थकबाकीदार रडारवर
पालिकेने प्रत्येक प्रभागातील बडय़ा थकबाकीदारांची यादीच तयार केली आहे. यानुसार प्रत्येक प्रभागातील पहिल्या पाच थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यावर भर देण्यात येणार आहे. यातील काही थकबाकीदारांची शेकडो कोटी रुपयांची थकबाकी आहे.
कायद्यानुसारच कारवाई
न्यायालयात प्रलंबित नसलेल्या प्रकरणात थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करून वसुली करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेने कायद्यातही तरतूद केली आहे.


























































