नाथमंदिर परिसर विकासासाठी २३ कोटींची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पैठण

पैठण-आपेगाव तीर्थक्षेत्र या २२२ कोटी रुपयांच्या विकास प्राधिकरणाअंतर्गत नाथमंदिर परिसर विकासकामांसाठी तब्बल २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पैकी १६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, लवकरच विविध कामांना प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती आमदार तथा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष संदिपान भुमरे यांनी ‘सामना’शी बोलताना दिली.

पैठण ही शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी आहे. प्राचीन तीर्थक्षेत्र व आधुनिक पर्यटनस्थळ आहे. येथून जवळच असलेले आपेगाव हे ज्ञानेश्वरादी भावंडांचे जन्मक्षेत्र आहे. पैठणचे भूमिपुत्र तथा तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी २१० कोटींच्या या प्राधिकरणाची घोषणा केली होती. आमदार संदिपान भुमरे यांनी या समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. दरम्यान, नुकतीच प्राधिकरणाची बैठक झाली. यात नाथमंदिर व परिसरातील विकासासाठी २३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पैकी १६ कोटींच्या निधीची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गही करण्यात आलेली आहे. यातून वारकरी, यात्रेकरू व भाविक-दर्शनार्थींना नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. यातून संपूर्ण नाथमंदिराभोवती ३ कोटींची सुरक्षा भिंत व २ कोटी खर्चून जुन्या ‘पडसाळी’ यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. जवळच असलेल्या दत्तात्रय मंदिरासमोर ५० लाखांचे सभागृह, सिमेंट काँक्रिटीकरण, भिंती सुशोभीकरण, वाहनतळ, ३ सार्वजनिक सुलभ शौचालये, अंतर्गत रस्ते व अन्य नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत. मंदिराच्या परिसरात असलेल्या मोठ्या नाल्याला ‘भूमिगत गटारी’त रूपांतरित केले जाणार आहे. हे सांडपाणी मंदिरापासून सुरक्षित अंतरावर सोडले जाणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी हे काम करणे गरजेचे आहे, असेही नाथमंदिर संस्थान विश्वस्त मंडळ अध्यक्ष व प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा आमदार संदिपान भुमरे यांनी स्पष्ट केले.

निधीबाबत अपप्रचार… विरोधकांना पोटशूळ! : दादा बारे
नाथमंदिर संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा माजी तालुकाप्रमुख दादा पाटील बारे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, ‘आमदार भुमरे यांच्या प्रयत्नामुळे हा मोठा निधी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठलेला आहे. ९८ लाखांचा निधी वापराअभावी परत गेल्याचा अपप्रचार केला जात आहे. वास्तविक मंदिराच्या अंतर्गत ‘डोम’ उभारणीसाठी २ कोटींची आवश्यकता असताना ९८ लाखांचा अपुरा निधी मिळाला. ३ वेळा जाहीर निविदा प्रसिद्ध करूनसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. नाथमंदिर संस्थानकडे या कामासाठी कुशल तंत्रज्ञ उपलब्ध नाही. त्यामुळे तो निधी परत करून प्राधिकरणाच्या बैठकीत नवीन निर्णय घेण्यात आला. आमदार भुमरे यांच्या सूचनेनुसार ‘डोम’साठी अधिकच्या निधीची तरतूद करून तो २ कोटी ५० लाखांवर नेण्यात आला आहे. तसेच तंत्रज्ञ-अभियंता असलेल्या पैठण सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणीही अशा अफवा आणि अपप्रचारावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नाथमंदिर संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांनी केले आहे.