
सामना प्रतिनिधी । मुखेड
उमरी तालुक्यातील महाटी व कोडगाव येथील वारकरी वारी संपवून आपल्या गावी परतत असताना त्यांच्या पिकअप जीपला रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मुखेड जवळील सावरगाववाडी येथे एका दुचाकीस्वारास वाचविताना अपघात घडला. यात 23 वारकरी जखमी झाले असून, त्यातील पाच जण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.
मागील वीस दिवसापासून आळंदी ते पंढरपूर प्रति वर्षाची वारी करून काल द्वादशीचे पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर गाणगापूरचे दर्शन या वारकऱ्यांनी घेतले व तुळजापूर येथे मुक्काम केला. आज सकाळी तुळजापूर येथील तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परत आपल्या गावाकडे निघाले असताना मुखेड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाववाडी येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या (दुचाकी क्र. एमएच-26-ए.एच. 3760) दुचाकीस्वारास वाचविताना पिकअप (जीप क्रमांक एमएच-30 एबी-3758) चालकाने तातडीने ब्रेक लावले असता सदर जीप रस्त्यावरच उलटली. प्रयत्न करूनही दुचाकी या जीपवर आदळली. यात दुचाकीस्वारांना किरकोळ मार लागल्याचे कळते. जीपमध्ये प्रवास करणाऱ्या 23 वारकरी जखमी झाले असून यातील पाच जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.
























































