पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन करण्यात आले, मात्र गेल्या दहा वर्षांत या कामाला गती मिळालेली नाही. स्मारकाच्या कामावर आतापर्यंत 25 कोटी 73 लाख रुपयांचा केलेला खर्च पाण्यात गेला की काय, अशी विचारणा आता होऊ लागली आहे.
अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी किती खर्च झाला, अशी विचारणा माहितीच्या अधिकारात रमेश सावंत यांनी संबंधित विभागाला केली होती. त्याला देण्यात आलेल्या उत्तरात या प्रकल्पासाठी गेल्या दहा वर्षांत 382 कोटी 83 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामधील 25 कोटी 73 लाख 32 हजार रुपये आतापर्यंत खर्च झाल्याचे म्हटले आहे.
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ट आहे. या प्रकल्पावर झालेला 25 कोटी रुपयांचा खर्च हा साधारणतः सल्लागार फी, पर्यावरण अभ्यास, भुस्तर चाचणी, प्रकल्प कार्यालय व अन्य बाबींसाठी झाल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता आर.आर. शिवदे यांनी दिली आहे.