महत्त्वाच्या बातम्या – अमरनाथ यात्रेसाठी साडेतीन लाख भाविकांची नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होणार आहे. यासाठी 15 एप्रिलपासून नोंदणीला सुरुवात झाली असून आतापर्यंत 3.6 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. सध्या यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी 10 ते 12 फूट बर्फ साचलेला आहे. 15 जूनपर्यंत दोन्ही मार्ग मोकळे केले जातील. या वर्षी अमरनाथ यात्रा 57 दिवसांची असणार आहे. 3 जुलैला सुरू होऊन 28 ऑगस्टला ही यात्रा संपेल. यंदा यात्रेला किमान 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे.

40 मिनिटांत 6095 कोटींच्या कलाकृती विकल्या

‘क्रिस्टीज’ने अवघ्या 40 मिनिटांच्या लिलावामध्ये 6 हजार 95 कोटी रुपयांच्या कलाकृती विकल्या, तर अवघ्या एका रात्रीत तब्बल 1.1 अब्ज म्हणजेच जवळपास 10 हजार 642 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कलाकृती विकल्या. जॅक्सन पोलॉक, कॉन्स्टँटिन ब्रांकुसी आणि मार्क रोथको यांच्या कलाकृतींसाठी सर्वाधिक बोली लागली. एलिस नीलची 1967 सालची पेंटिंग ‘मदर अँड चाइल्ड’ सहा मिनिटांच्या बोलीनंतर 18 लाख डॉलरला विकली गेली.

राउल कॅस्ट्रो यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल

अमेरिकेने क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांच्यावर 1996 मध्ये दोन विमाने पाडल्याबद्दल आणि चार लोकांची हत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अमेरिकन नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणात करण्यात आली आहे, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे. 1996 मध्ये ‘ब्रदर्स टू द रेस्क्यू’ गटाची दोन विमाने पाडण्यात आली. यात चार लोकांचा मृत्यू झाला होता, त्यात तीन अमेरिकन नागरिक होते.