झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हॉकी सामन्यादरम्यान मैदानावर वीज पडून तीन तरुण खेळाडूंचा मृत्यू झाला, तर पाच गंभीर जखमी झाले आहेत. सिमडेगा जिल्ह्यातील कोलिबिरा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिमडेगा जिल्ह्यातील कोलिबिरा येथे जपला आरसी स्कूलच्या मैदानावर हॉकी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रेक्षकांनीही गर्दी केली होती. दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर पोहोचले. मात्र त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसासह विजेचे तांडव सुरू झाले.
सामना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची आडोसा शोधण्यासाठी धावपळ सुरू होती. मात्र खेळाडू मैदानातच उभे होते. याचवेळी हॉकीच्या मैदानावर कडकडाटासह वीज कोसळली. यामुळे तीन नवोदित खेळाडूंचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तीन तरुण खेळाडूंचा मृत्यू झाला परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच मृतांची ओळखही पटवण्यात आली असून इनोश (Enosh), सेनन डांग (Senan Dang) आणि निर्मल होरो (Nirmal Horo) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हॉकीची नर्सरी
झारखंडच्या सिडेगा जिल्ह्याला हॉकीची नर्सरी म्हटले जाते. येथून निघालेले अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळले. यात सिल्वानुस डुंगडुंग, ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेला विमल लडका, ससुराई टेटे, सलिमा टेटे यांचा समावेश आहे. हे सर्व सिमडेगा जिल्ह्यातील रहिवासी असून येथे वीज पडून तीन नवोदित हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाल्याने क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.