बिहारमध्ये भीषण रेल्वे अपघात, नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस घसरून 4 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतून गुवाहाटीला जाणाऱया नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला बिहारच्या बक्सर जिह्यात भीषण अपघात झाला आहे. रघुनाथपूर स्टेशनजवळ आज रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी या एक्स्प्रेसचे 6 डबे रुळांवरून घसरले असून या दुर्घटनेत 4 प्रवासी ठार तर 100 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

दिल्लीतील आनंद विहार येथून निघालेली ही ट्रेन कामाख्याला जाणार होती. या ट्रेनला बिहारमध्ये भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. अपघातस्थळी युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. रात्र असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अपघातानंतर सीमांचल एक्सप्रेस, गुवाहाटी राजधानी एक्स्प्रेस, विभूती एक्स्प्रेस, पंजाब मेलसह अनेक ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत.