चंद्रपुरात 3 मुले बेपत्ता, पोहताना बुडाल्याची भीती

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामध्ये 3 मुले बेपत्ता झाल्याने घबराट पसरली आहे. ही मुलं कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक परिसरात पोहायला गेली होती. ही मुले बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. पोलीस ही मुले जिथे पोहायला गेली होती तिथे शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळावर पोलिसांना मुलांचे कपडे व इतर साहित्य सापडले आहे. मुलांचा शोध घेणे सुरू आहे. रात्र उशिरा पर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली होती मात्र अंधार झाल्याने बचाव पथकाला अडचण येत होती. यामुळे रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली. आज पहाटे पासून ही शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. बेपत्ता झालेली तीनही मुले ही जवळपास 10 वर्षे वयाची आहेत. तिघेही जण एकाच वर्घातले असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरपना तालुक्यात येणाऱ्या अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी अंदाजे १० वर्षाची तीन मुल सायंकाळपर्यंत घरी परतली नाहीत. त्यांची शोधाशोध सुरू केली असता गुरूवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या डबक्याजवळ मुलांचे कपडे आढळून आले, यामुळे ही मुलं गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही मुलं डबक्यात पोहण्यासाठी गेली असावी आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापनाचे कर्मचारी व गडचांदूर पोलीसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत या मुलांचा शोध लागू शकला नव्हता.