जायकवाडीसाठी निळवंडे, ओझरमधून ३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

समन्यायी धोरणानुसार जायकवाडी प्रकल्पात निळवंडे आणि ओझर बंधाऱ्यातून पाणी सोडले जात आहे. या धरणांतून जायकवाडीसाठी ३००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडीमध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठा ६५५.०६७ दलघमी आहे. त्याची टक्केवारी ३०.१७ आहे.

जायकवाडी धरणात समन्यायी पाणी वाटपास नगर, नाशिक जिल्ह्यातून प्रखर विरोध झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जायकवाडी उर्ध्व प्रकल्पांतून पाणी सोडणे जलसंपदा विभागाला भाग पडले, मात्र सोडलेल्या पाण्याची पळवापळवीही मोठ्या प्रमाणात झाली. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार जायकवाडीसाठी ८.९९ टीएमसी पाणी सोडणे अपेक्षित असताना नगर, नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येत पाणी सोडणे थांबविण्यात आले. या भूमिकेमुळे मराठवाड्यातून संताप व्यक्त करण्यात आला. अखेर राज्य सरकारने समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार जायकवाडीसाठी घोषित पाणी मिळेल असे जाहीर केले होते. त्यानुसार निळवंडे धरणातून २००० क्युसेक्स आणि ओझर बंधाऱ्यातून १००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जायकवाडीचा पाणीसाठा ३०.१७ टक्के
समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार जायकवाडीच्या उर्ध्व प्रकल्पांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. आजमितीला या प्रकल्पात ३०.१७ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. प्रकल्पातील पाणी साठा फुटात १५०५.९९ असून, मीटरमध्ये ४९४.०२६ पाणी उपलब्ध आहे. एकूण पाणीसाठा १३९३.१७३ दलघमी आहे. यामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा ६५५.०६७ दलघमी असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. जायकवाडी प्रकल्पातून परळी औष्णिक केंद्र आणि गेवराईकरांना पिण्यासाठी पाणी दिले जात आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून १७०० क्युसेक्स आणि उजव्या कालव्यातून ३०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.