
तब्बल 20 दिवस तीव्र निदर्शने करून सरकारदरबारी फोडलेला टाहो… हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर पुनर्वसनासाठी सरकारला दिलेला 24 तासांचा अल्टिमेटम… असा चहूबाजूंनी खदखदता असंतोष बाहेर पडूनही मोदी सरकार ढिम्मच राहिले. त्यामुळे मदतीची आशा सोडून अखेर कश्मिरी पंडितांनी टार्गेट किलिंगच्या दहशतीपुढे शरणागती पत्करली आहे. कश्मीर खोऱ्याच्या मरणदाढेतून बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने हिंदू कुटुंबांनी पळापळ सुरू केली आहे. एकाच दिवसात तब्बल 1800 पंडितांसह 3 हजारांहून अधिक हिंदूंनी कच्च्याबच्चांसह मायभूमी सोडली. या सामूहिक पलायनामुळे कश्मीरातील हिंदू वस्त्या ओस पडू लागल्या आहेत.
दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगचा हैदोस घातला आहे. एकापाठोपाठ एक निष्पाप हिंदू नागरिकांच्या गोळ्या घालून हत्या केल्या जात आहेत. अशा भयंकर परिस्थितीत ‘आम्हाला कश्मीर खोऱयातून जम्मूच्या सुरक्षित ठिकाणी हलवा’, अशी कळकळीची विनंती कश्मिरी पंडितांनी केली. मात्र ना जम्मू-कश्मीरच्या प्रशासनाला, ना मोदी सरकारला कसलाच पाझर फुटला. उलट सुरक्षेसाठी जम्मूमध्ये जाणाऱया हिंदू कुटुंबांची बाहेर लष्कर तैनात संक्रमण शिबिरांमध्ये काsंडी करण्यात आली. दिवसाढवळ्या नरसंहार घडूनही सरकार ढिम्म राहिल्याने कश्मिरी पंडित आणि हिंदू कुटुंबांनी सामूहिक स्थलांतर सुरू केले आहे. हिंदूंच्या टार्गेट किलिंगचे सोशल मीडियातही तीव्र पडसाद उमटले आहेत. ‘द कश्मीर फाईल’ चित्रपटावरून प्रश्नांचे काहूर उठले आहे. या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर तसेच निर्माते विवेक अग्निहोत्री आता गेले कुठे? असा सवाल करीत त्यांच्यावर गंभीर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. कश्मिरी पंडित शांततेत जीवन जगत होते. खेर आणि अग्निहोत्री यांनी प्रपोगंडा चित्रपट बनवून दहशतवाद्यांना उसकावले. आता पंडितांना कश्मीर खोरे सोडून पळावे लागत आहे, तर खेर आणि अग्निहोत्री मात्र विदेशात ऐश करीत आहेत, असे ट्विट अभिनेता कमाल आर. खानने शुक्रवारी केले.
मट्टनच्या 90 टक्के हिंदूंनी रातोरात कॉलनी सोडली
पंडित कॉलनीमध्ये सन्नाटा पसरला आहे. कॉलनीतील 90 टक्के हिंदू सरकारी कर्मचाऱयांनी गुरुवारी रातोरात घर सोडले. टार्गेट किलिंगचे सत्र थांबण्याची चिन्हे नसल्यामुळे कश्मीर पंडित प्रचंड हादरले आहेत. अनंतनागच्या मट्टन येथील पंडित कॉलनीमध्ये सन्नाटा पसरला आहे. कॉलनीतील 90 टक्के हिंदू सरकारी कर्मचाऱयांनी गुरुवारी रातोरात घर सोडले आणि जीव वाचवण्यासाठी जम्मूचा रस्ता धरला. लोकांचा संयम सुटल्याने त्यांनी सामूहिक पलायन केले. चहूबाजूंनी स्थलांतराला सुरुवात झाली आहे. सुरक्षा बलांची नजर चुकवून शुक्रवारी भल्या पहाटे बारामुल्लातून 5, शेखपोरा येथून 12, श्रीनगरमधून 7 हिंदू कुटुंबे घराबाहेर पडली. पेंद्र सरकारने वेळीच सुरक्षा आणि पुनर्वसनाबाबत ठोस पावले उचलली नाही तर कश्मीरातील हिंदूंच्या असंतोषाचा मोठा उद्रेक होण्याची भीती आहे.
सरकारकडून नाकाबंदी; जागोजागी निमलष्कर तैनात
हिंदूंच्या सुरक्षित पुनर्वसनाच्या मुद्यावर ‘ब्र’ही न काढणाऱया मोदी सरकारने हिंदूंची कश्मीर खोऱयात नाकाबंदी केली आहे. कश्मिरी पंडित राहत असलेल्या परिसराबाहेर मोठय़ा प्रमाणावर पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.
कश्मीर पंडितांची ‘घरघर’
कश्मीर खोऱयात जवळपास 8 हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी 1800 कर्मचाऱयांसोबत त्यांच्या कुटुंबांतील तीन ते चार सदस्य आहेत. जवळपास 1300 कर्मचाऱयांची संक्रमण शिबिरात (ट्रान्झिट पॅम्प) व्यवस्था केली गेली होती, उर्वरित कर्मचाऱयांची भाडय़ाच्या घरांमध्ये वणवण सुरू राहिली. त्यातच सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यास मोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्यामुळे तब्बल 1800 हिंदू कुटुंबांना खोऱयातून ‘पॅकअप’ करावे लागले आहे.
अमित शहांना क्रीडामंत्री करा
कश्मीरमध्ये होत असलेल्या पंडितांच्या आणि हिंदूंच्या हत्यांमुळे विरोधकांच्या निशाणावर असलेल्या अमित शहा यांना आता भाजप खासदार सुब्रमणीयम स्वामी यांनी चांगलेच सुनावले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रुची क्रिकेटमध्ये वाढत आहे. त्यामुळे त्यांनी आता गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि क्रीडामंत्री व्हावे, असा खोचक सल्ला दिला आहे. 370 कलम रद्द केल्यानंतरही गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडितांची आणि हिंदूंची एकापाठोपाठ एक हत्या करण्यात येत आहे. त्यावर देशभरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
लग्नाचा अल्बमही आला नव्हता
कुलगाममध्ये टार्गेट किलिंगचा बळी ठरलेला बँक मॅनेजर विजयकुमार बेनीवालचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नसोहळ्यात कॅमेऱयात टिपलेले आनंदाचे क्षण पाहण्याची विजयकुमारची इच्छा अधुरीच राहिली.

























































