लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टरांसह 32 जण पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. अशातच दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयातून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही तेथील अनेक डॉक्टरांसह 32 आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णालयात घबराट पसरली असून लसीच्या परिणामकारकतेबद्दलही शंका व्यक्त होऊ लागली आहे.

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर्स गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्याच्या दुसऱया दिवशीच आज एम्स रुग्णालयातून हे चिंता वाढवणारे वृत्त आले.

लसीकरणाने घालता येईल कोरोनाच्या वेगाला लगाम

कोरोनाचा वेग सध्या प्रचंड आहे. त्याला लगाम घालण्यासाठी सध्यातरी लसीकरण हा अत्यंत प्रभावी उपाय असून जास्तीत जास्त नागरिकांना लस दिल्यानंतर कोरोना संसर्ग कमी होईल असा विश्वास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान सचिव आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केला.

देशात प्रत्येकी 100 पैकी 9 जण कोरोनाबाधित  

देशातील ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहिली तर छत्तीसगढ आणि महाराष्ट्रानंतर चंदिगड (10.6 टक्के) आणि पंजाब (10 टक्के) यांचा नंबर लागतो. देशात बाधित रुग्ण सापडण्याचा वेग वाढून 9.21 टक्के झाला आहे. याचाच अर्थ देशातील प्रत्येकी 100 नागरिकांपैकी 9 जण कोरोनाबाधित आढळत आहेत.

हिंदुस्थानची अवस्था अमेरिकेसारखी; रुग्णसंख्या अचानक वाढली

कोरोनाच्या बाबतीत हिंदुस्थानची अवस्था आता अमेरिकेसारखी झाली आहे. अमेरिकेत गेल्या वर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत होती, परंतु ऑक्टोबरमध्ये त्यात अचानक वाढ झाली आणि डिसेंबरमध्ये तर एका महिन्यात 63.45 लाख रुग्ण सापडले होते. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातही कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा अचानक वाढू लागली आहे. या वेगाला आवर घालता आला नाही तर हिंदुस्थानची अवस्था अमेरिकेपेक्षाही गंभीर होण्याचा धोका आहे.