दि रेवदंडा को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे येस बँकेत 35 लाख अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येस बँकेवर आरबीआय निर्बंध लावल्याने लाखो खातेदारावर आर्थिक संकट कोसळले आहे. ग्राहकासह काही को ऑपरेटिव्ह बँकांनाही याचा फटका बसला असून त्यांचेही कोट्यवधी रुपये यामुळे अडकले आहेत. यात को ऑपरेटिव्ह बँकांमध्ये रायगड जिल्ह्यातील दि रेवदंडा को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचेही 35 लाख अडकले आहेत. मात्र असे असताना रेवदंडा अर्बन बँकेची स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा बँक प्रशासनाने दिला आहे. रायगड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे याबाबत कागदपत्रे दिली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन वामन घरत यांनी दिली आहे.

येस बँकेच्या अनियमत आर्थिक व्यवहारामुळे आरबीआयने या बँकेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येस बँकेत राज्यातील को ऑपरेटिव्ह बँकांनी आपल्या ठेवी खाते उघडून ठेवल्या आहेत. त्यामुळे आता येस बँक बुडीत निघाल्याने को ऑपरेटिव्ह बँकांचे पैसेही सध्याच्या घडीला बुडीत जाण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील दि रेवदंडा को ऑपरेटिव्ह अर्बन बँक ही नावाजलेली बँक आहे. या बँकेने येस बँकेत आपले चालू खाते उघडले असून याद्वारे आपल्या बँकेतील चेकचा व्यवहार करीत होती. येस बँकेवर निर्बंध आल्याने दि रेवदंडा को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे 35 लाख रुपये आता अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील बँकांवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे नियंत्रण असते. मात्र सहकार क्षेत्रातील बँका जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची परवानगी वा सल्ला न घेता परस्पर खाजगी बँकांमध्ये खाती उघडून ठेवी ठेवत असतात. त्यामुळे आर्थिक फटका बँकांना सहन करावा लागतो. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकार्‍यांनी दिली.

दि रेवदंडा को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेने येस बँकेत चालू खाते उघडले असून आधी 72 लाख जमा होते. मात्र सध्या या खात्यात 35 लाख जमा आहेत. मात्र असे असले तरी सद्यस्थितीत बँकेची स्थिती उत्तम आहे. या खात्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. अशी माहिती बँकेचे संचालक वामन घरत यांनी दिली आहे.