रस्ते धुण्यासाठी साडेतीनशे टँकर,प्रत्येक वॉर्डात दहा टँकर वाढवणार; दररोज एक हजार किमी रस्ते धुणार

मुंबईत रस्त्यावरील धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका साडेतीनशे टँकरचा वापर करणार आहे.  सद्यस्थितीत पालिकेचे 35 आणि कंत्राटदाराचे मिळून शंभर टँकर आहेत. तर आता प्रत्येक वॉर्डात दहा टँकर वाढवण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज बैठकीत संबंधित घन कचरा व्यवस्थापन विभागाला दिले. या टँकरच्या माध्यमातून पालिकेच्या अखत्यारीतील दोन हजार किमी रस्त्यांपैकी एक हजार किमी रस्ते दररोज धुतले जाणार आहेत.

 मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाला बांधकामांमधून उडणारी धुळ, रस्त्यांवरील धुळ प्रमुख कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने हवेतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांना गती दिली आहे. यामध्ये सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फुटपाथ स्वच्छ करून ते पाण्याने धुऊन काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत. पालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. सद्यस्थितीत यातील सुमारे 700 किमी रस्ते धुतले जात आहेत. आता दररोज एक हजार किमी रस्ते धुण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुनर्प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर

रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या आणि स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत नाही. मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीमध्ये (ऑफपीक अवर्सविशेषतः पहाटे 3 ते सकाळी 6 दरम्यान रस्ते धुण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात हे काम केले जात आहे.