
लडाखमधील हिंदुस्थानची तब्बल 38 हजार स्क्वेअर (चौरस)किलोमीटर जमीन चीनने बळकाविली आहे अशी अत्यंत धक्कादायक कबुली संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज लोकसभेत दिली. एवढेच नाहीतर पाकव्याप्त काश्मीरमधील 5180 चौरस किलोमीटरचा भूभागही पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या चीनकडे सोपविला आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान लडाखमध्ये आव्हानात्मक परिस्थिती आहे.आपल्या जवानांचे साहस, शौर्य, पराक्रमावर अवघ्या देशाचा विश्वास आहे असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
लडाख सीमेवर चीनकडून सातत्याने घुसखोरी सुरु आहे. लष्करी आणि राजनैतिक पातळ्यांवर चर्चेच्या अनेक फेऱ्य़ा झाल्या तरी चीनच्या कुरापती सुरूच आहेत. सीमेवर काय स्तिथी आहे? हे जाणून घेण्याचा देशाला अधिकार आहे. या मुद्यावर काँग्रेस पक्षाकडून लोकसभेत स्थगन प्रस्ताव आणण्यात आला होता. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निवेदन केले. मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी लोकसभा अध्यक्षांनी दिली नाही. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांच्या निवेदनानंतर काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.
चीनच्या एप्रिलपासून कुरापती
- पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्य़ात 15 जूनला हिंसक संघर्ष झाला. त्यात हिंदुस्थानचे 20जवान शहीद झाले. मात्र गलवान खोऱ्य़ात एप्रिलपासूनच चीनच्या कुरापती सुरू होत्या याची कबुली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आणि घटनाक्रम सांगितला.
- ह पूर्व लडाखच्या सीमेवर एप्रिल महिन्यात चिनी सैन्याची आणि शास्त्रसाठ्याची वाढ दिसली. मे महिन्यात गलवान खोऱ्य़ात चिनी सैनिकांनी हिंदुस्थानी जवानांना अडथळा आणला. दोन्ही सैनिक आमने-सामने आले.
- या तणावाच्या पार्शवभूमीवर 6 जूनला कमांडर पातळीवर चर्चा झाली.
- 15 जूनला चीनकडून हिंसक संघर्ष झाला. हिंदुस्थानच्या बहादूर जवानांनी बलिदान दिले. चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले. चीनची मोठी हानी यात झाली.
- जिथे संयम पाहिजे तिथे जवान संयम राखून आहेत. जिथे शौर्य हवे तेथे आपल्या जवानांनी शौर्य दाखविले आहे. जवानांच्या पराक्रमावर संपूर्ण देशवासीयांचे विश्वास आहे.
संरक्षण मंत्री काय म्हणाले
- सीमाप्रश्न जटील मुद्दा आहे हे दोन्ही देशांच्या औपचारिकरीत्या मान्य केले आहे.
- हा प्रश्न सोडविण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे. शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातून समाधान निघू शकते.
- 1993 आणि 1996च्या करारानुसार प्रत्येक्ष ताबा रेषेचा (एलएसी) आदर करायचा, उल्लंघन करायचे नाही, असे ठरले. दोन्ही देश सैन्याची तैनाती येथे कमी ठेवतील असा उल्लेख आहे.
- लडाखमधील हिंदुस्थानची 38 हजार चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावली आहे.
- पाकिस्तानने ‘पीओके’मधील 5180 चौरस किलोमीटरचा भूभाग बेकायदेशीररीत्या चीनच्या हवाली केला आहे.
अरुणाचल सीमेजवळ चिनी सैन्याची जमवाजमव!
लडाख सीमेवर कुरापती करणाऱ्य़ा चीनने आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरु केली आहे. ‘एलएसी’ पासून 20 किलोमीटरवर चीनी सैनिक आहेत. दरम्यान हिंदुस्थानच्या लष्कराने हाय अलर्ट जारी केला असून जवान सतर्क आहेत. ‘एएनआय’ ने दिलेल्या वृत्तानुसार टूलिंग, चांग ज, फिशटेल 2 याभागात चीनी सैन्य आले आहे. एलएसीपासून 20 किलोमीटरवर हे सैन्य आहे. घुसखोरी करण्याचा चीनचा डाव असू शकतो. हिंदुस्थानी लष्कर अलर्ट आहे. जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे.

























































