स्टेट बँकेतून चाळीस हजारांची रोकड घेऊन चोरटा पसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जिंतूर

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बचत खात्यातून 40 हजार रुपये काढून त्या रकमेची पासबुकमध्ये नोंद घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या व्यक्तीच्या वरच्या खिशातील 40 हजार रुपये एका अल्पवयीन चोरट्यांने लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत जिंतूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

शहरातील आजम कॉलनी परिसरातील रहिवाशी शेख साजिद शेख नजीर यांनी घराच्या दुरुस्तीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिंतूरमधील त्यांच्या बचत खात्यातून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चाळीस हजार रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम वरच्या खिशात ठेवून काढलेल्या रकमेची नोंद पासबुकमध्ये घेण्यासाठी ते काउंटरला रांगेत उभे होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात अल्पवयीन चोरट्याने त्यांच्या वरच्या खिशात ठेवलेले 40 हजार रुपये काढून पलायन केले. हा प्रकार लक्षात येताच शेख साजिद यांनी लगेच बँकेतील सीसीटीव्हीची तपासणी केली असता एक चोरटा त्यांच्या खिशातील रक्कम काढून पळून असताना दिसला. याबाबत त्यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

शहरातील बसस्थानक तसेच विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात यापूर्वीही ग्राहकाचे, प्रवाशांचे पैसे चोरण्याच्या घटना घडल्या आहेत. एकाही घटनेचा अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बँकेत, बसस्थानकावर चोरी करणाऱ्याया अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.