
महाराष्ट्र राज्याचे वन्यप्राणी मानचिन्ह असलेल्या शेकरूंची भीमाशंकर अभयारण्यात गणना केली गेली. संपूर्ण जंगलात 16 हजार 343 घरटी व 482 शेकरू आढळून आले आहेत. गणनेदरम्यान मोठ्या आकाराची घरटी जास्त प्रमाणात दिसल्याने शेकरू संगोपनाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिली.
पानगळी रानांपासून ते सदाहरित अरण्यापर्यंत अनेक प्रकारच्या जंगलांनी आपल्या महाराष्ट्राला समृद्ध केलं आहे. या सगळ्या जंगलातील वन्य जिवांमधून महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून निवड कोणाची करायची? या अवघड प्रश्नाचं उत्तर मिळालं. पुण्याजवळच्या भीमाशंकरच्या अभयारण्यात या जंगलाची शान म्हणजे इथे आढळणाऱ्या जायंट स्क्विरल अर्थात शेकरू. तसे अगदी हिमालयाच्या पायथ्यापासून ते केरळच्या जंगलापर्यंत हिंदुस्थानात शेकरूंच्या एकूण सात उपप्रजाती आढळतात, पण भीमाशंकर येथे आढळणारे शेकरू मात्र फक्त भीमाशंकरच्या रानातच आढळतात. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच सापडणारा प्राणी म्हणून या भीमाशंकरी शेकरूची निवड राज्यप्राणी म्हणून झाली.
भीमाशंकरचे अभयारण्य 114 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले असून, भीमाशंकर अभयारण्य क्रमांक 1 व 2 अशा दोन भागांत विभागले गेले आहे. शेकरू झाडाची पाने, काटक्या यांच्या साहायाने घुमटाकार आकाराची घरटी बनवते.
शेकरू डिसेंबरजानेवारी महिन्यात मिलन करतात. एक मादी दरवर्षी प्रजनन करेलच असे नाही. त्यामुळे शेकरूंची संख्या झपाट्याने वाढत नाही. शेकरू वर्षातून एकवेळा एका पिल्लाला जन्म देते. मादी सहा महिने पिल्लांचे संगोपन करते. शेकरू
सर्वसाधारणपणे झाडावर राहणारा, प्रामुख्याने फळे खाणारा व फळे नसतील तर बीज, झाडांची फुले, साल खाणारा प्राणी आहे. सर्प व गरुड शेकरूंची शिकार करतात.
दोन परिमंडळांतील 12 नियम क्षेत्रात गणना
भीमाशंकर अभयारण्यातील दोन परिमंडळांतील 12 नियम क्षेत्रात शेकरूंची गणना घरटी मोजून व प्रत्यक्ष दिसलेल्या शेकरूंची नोंद घेऊन गणना केली गेली. कोंढवळ, निगडाळे, भोरगिरी, आहुपे, पिंपरगणे, भट्टी, भोमाळे, वेहळोली, साखरमाची, साकेरी, पाटण, घाटघर या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. घरटी पाहताना वापरलेली, दुरुस्तीची गरज असलेली, सोडून दिलेली व गर्भ घरटी अशा चार प्रकारची घरटी शोधन नोंदी केल्या गेल्या.
घरट्यांची नोंदी घेताना ठिकाण, झाडाचा प्रकार, शेकरू प्रत्यक्ष दिसल्यास त्याचे ठिकाण याच्या नोंदी अक्षांश-रेखांशासह घेण्यात आल्या. वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एस. रमेश कुमार, सहायक वनसंरक्षक दिलीप भुर्के, यांच्या मागदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, वनपाल एन. एच. गि-हे, एम. जी. वाघुले यांच्यासह वन्यजीव विभागाच्या वनरक्षकांनी शेकरू गणना केली.


























































