
अमेरिकेच्या टेक्सास मधील शाळेत एका माथेफिरू तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबाराची घटना ताजी असतानाच आज अमेरिकेत पुन्हा एकदा अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील तुलसा येथील सेंट फ्रान्सिस हॉस्पिटल कॅम्पसमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात शुटरसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून ते रुग्णालय परिसर रिकामा करत आहेत.
रुग्णालयाच्या कॅम्पसमधील दुसऱ्या मजल्यावर एका माथेफिरूने हा गोळीबार केला. गोळीबार झाल्यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता काही लोकांना गोळ्या लागल्याचे त्यांना आढळले. या गोळीबारात एका जोडप्याचाही मृत्यू झाला होता. तर कित्येक जण जखमी झाले होते. यावेळी पोलिसांना तो शूटरही मृत अवस्थेत आढळला. त्याच्याकडे एक लांब रायफल आणि एक पिस्तूल होती. संशयित बंदूकधारी व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
मागील आठवड्यात अमेरिकेच्या टेक्सास मधील शाळेत एका माथेफिरू तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 19 चिमुकल्यांसह 2 शिक्षक ठार झाले. अंदाधुंद गोळीबाराच्या या सततच्या घटनांमुळे अमेरिकेतील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
























































