
सामना ऑनलाईन । श्रीनगर
सोपोरपाठोपाठ शुक्रवारी शोपियां जिल्हय़ात लष्कर व अतिरेक्यांत भयंकर धुमश्चक्री उडाली. या चकमकीत हिजबूल मुजाहिदीनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा झाला. ही कारवाई चालू असताना फुटीरवाद्यांनी दगडफेक करून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक पोलिसांनी तो उधळून लावला.
शोपियां जिल्हय़ात सुगान येथे काही अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागात स्थानिक पोलीस, लष्कर तसेच सीआरपीएफने संयुक्त शोधमोहीम सुरू केली. लष्कराने घेरताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. लष्कराने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात तीन अतिरेक्यांचा खात्मा झाला. शाहीद जसीम, आबीद मंजूर मगरे उैर्फ सज्जू आणि हिलाल भट अशी या अतिरेक्यांची ओळख पटली असून हे तिघेही हिजबूल मुजाहिदीनसाठी काम करत असल्याचे सांगण्यात आले.
फुटीरवाद्यांनी या शोधमोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तुफान दगडफेक करण्यात आली. मात्र स्थानिक पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवले. यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

























































