5 वेळा आमदारकी भूषविलेल्या मुख्तार अन्सारीला 10 वर्षांचा तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

5 वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेल्या मुख्तार अन्सारीला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्सारी हा उत्तर प्रदेशातील एक मोठा गुंड असून आमदार कृष्णानंद राय हत्याप्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे. याच प्रकरणात त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे. या हत्याप्रकरणात अन्सारी याचा भाऊ अफजाल अन्सारी हा देखील सामील होता. अफजाल हा बहुजन समाज पक्षाचा खासदार आहे. अफजालविरूद्धचा निकाल हा मुख्तारसोबत सुनावण्यात आला नाही.

भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या आणि व्यापारी नंदकिशोर रुंगटा यांच्या अपहरणाप्रकरणी अन्सारी बंधू आणि त्यांचा नातेवाईक असलेल्या एजाजुल हक यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. खटला सुरू असताना हक याचा मृत्यू झाला होता. 1एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. 15 एप्रिलला या खटल्याचा निकाल लागणार होता, मात्र निकालाची तारीख पुढे ढखलण्यात आली होती.

9 नोव्हेंबर 2005 मध्ये मोहम्मदाबादचे आमदार कृष्णानंद राय यांची हत्या करण्यात आली होती. निवडणुकीत पराभवाचा राग आल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. मोहम्मदाबाद हा अन्सारी बंधूंचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जात होता. या मतदारसंघात राय यांनी 2002 साली मुख्तार अन्सारीचा भाऊ अफजाल याचा पराभव केला होता. याचा राग आल्याने अन्सारी बंधूनी राय यांची हत्या केली होती. राय हे एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेला हजेरी लावून परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. राय यांच्या ताफ्यावर एके47 ने 500 गोळ्या झाडल्या होत्या.