भाजपकडून सत्ताधारी आमदारांना 50 कोटींचे आमिष; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील सत्ताधाऱयांकडून कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी सत्ताधारी आमदारांना 50 कोटींचे आमिष दाखविले जात आहे, असा खळबळजनक दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

दक्षिणेकडील राज्यांत ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. कर्नाटकातील कॉँग्रेसच सरकार पाडण्यासाठी भाजप मागील एक वर्षापासून प्रयत्न करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. आमच्या आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. त्यांनी पूर्ण प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी झाले, असे ते म्हणाले.

लोकसभेत जर काँग्रेसचा पराभव झाला तर कर्नाटकमधील सरकार टिकेल का? असा प्रश्न विचारला असता सिद्धरामय्या म्हणाले की, ते शक्य नाही. आमचे आमदार काँग्रेसला सोडून जाणार नाहीत. एकही आमदार बाहेर जाणार नाही. कर्नाटकातील आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

केंद्रात भाजपशिवाय सरकार बनेल

‘अब की बार 400’ पारचा नारा ते देत असले तरी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला केंद्रात सरकार बनवण्यासाठी पुरेशा जागा मिळणार नाहीत. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले नाही तरी केंद्रात भाजपशिवाय सरकार बनेल, अशी आशा सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली आहे.