पुण्यातून 5970 नित्राझेपमचा साठा केला जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नित्राझेपम या झोपेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या तिघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) पुण्याहून अटक केली. या तस्करीत केमिस्टवाल्याचादेखील सहभाग असल्याचे उघड झाले आहे. जप्त केलेल्या झोपेच्या गोळ्या या बिहार आणि आंध्र प्रदेश येथून तयार करून पुण्यात आणत असायचे.

नित्राझेपम या झोपेच्या गोळ्यांची काही जण तस्करी करत असल्याची माहिती एनसीबी मुंबई युनिटला मिळाली. बिहार आणि आंध्र प्रदेश येथे तयार केलेल्या झोपेच्या गोळ्या पुण्यात आणल्या जात असायच्या. तीन दिवसांपूर्वी एनसीबीने एका कुरियर कार्यालयात सापळा रचला. तेथे सागर बी. आणि राजेश पार्सल घेण्यासाठी आले. एनसीबीने त्या दोघांना ताब्यात घेऊन पार्सल जप्त केले. ते पार्सल उघडले असता त्यात 5,970 नित्राझेपमच्या गोळ्या होत्या.

एनसीबीने सागरची चौकशी केली. त्याच्या चौकशीत स्वराज बी. नावाच्या एकाची माहिती मिळाली. स्वराजने ते औषधाचे पार्सल मागवल्याचे सागरने चौकशीदरम्यान एनसीबीला सांगितले. त्यानंतर एनसीबी मुंबई युनिटने स्वराजला ताब्यात घेतले. स्वराज हा पूर्वी रस्त्यावर ड्रगची विक्री करायचा. त्यानंतर तो केमिस्टच्या व्यवसायात आला. गोळ्यांची तस्करीप्रकरणी त्या तिघांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. या तिघांनी आतापर्यंत किती गोळ्यांचा साठा आणला होता, तो साठा कोणाला विकला याचा तपास एनसीबी करत आहे.