
सामना ऑनलाईन । वसई
विरार जवळच्या वैतरणा रेल्वे स्थानकात एका 7 वर्षीय शाळकरी मुलाच्या बॅगमध्ये 6 लाख 48 हजार 640 रुपयाची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी रात्री 8.45 वाजताच्या सुमारास वैतरणा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पाठीवर शाळेची बॅग असलेला मुलगा ट्रेनची वाट पाहत उभा होता. यावेळी तेथे असलेल्या एका तरुणाला मुलाचा संशय आल्याने त्याने गाडीत बसल्यावर मुलाची बॅग तपासली असता त्याला धक्काच बसला. कारण बॅगेत पुस्तकांऐवजी चक्क नोटांची बंडले होती.
वैतरणा येथील तुषार पाटील हा तरूण गुरुवारी कामानिमित्त विरार येथे जात असताना त्याचे लक्ष एकटाच गाडीची वाट पाहत असलेल्या 7 वर्षाच्या मुलाकडे गेले. कुतूहलापोटी त्याने मुलाची चौकशी केली असता त्याला संशय आला. त्यामुळे त्याने मुलाची बॅग तपासली असता बॅगमध्ये 6 लाख 48 हजार रुपयांची रोकड आढळली. तसेच त्याने आपण नालासोपारा पूर्वेच्या अन्सारी नगरमध्ये राहत असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे तुषारने या संपूर्ण प्रकाराची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. हा मुलगा वैतरणा रेल्वेस्थानकात कसा आला? व त्याच्याकडे येवढी मोठी रक्कम कशी आली? हवाला रॅकेटसाठी या मुलाचा वापर केला जात होता का? असे अनेक प्रश्न लोहमार्ग पोलिसांपुढे निर्माण झाले आहेत. वसई लोहमार्ग पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. तसेच प्रमाणिकपणा दाखवून पोलिसांना सहाय्य केल्याबद्दल लोहमार्ग पोलिसांनी तुषार पाटील आणि त्याचा मित्र मनिष रक्टे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


























































