हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचे 66 बळी

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसामुळे 66 जणांचा मृत्यू झाला आहे. शिमला आणि जोशीमठ पावसामुळे आणि भुस्खलनामुळे घरे कोसळली असून ढिगाऱ्याखाली अद्याप काहीजण अडकली आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाची संततधार सुरू असून अनेक ठिकाणी  भूस्खलन झाले आहे. भूस्खलन आणि घरे कोसळल्याने 66 नागरिकांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत. जखमींना वाचवण्याचे आणि ढिगाऱ्यांखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम अजून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक मृत्यू हिमाचल प्रदेशात झाले आहेत. हिमाचल प्रदेशात 13 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस पडत असून इथे 60 जण दगावले आहेत  असे तिथले मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले आहे. चिंतेची बाब ही आहे की, येत्या दोन दिवसांत हिमाचल प्रदेशातपुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्येही पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शिमल्यातील कृष्णनगर परिसरात भूस्खलनामुळे सहा तात्पुरत्या घरांसह किमान आठ घरे कोसळली आणि एक कत्तलखाना ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. इथे सोमवारपासून एकूण 19 मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे.  समर हिल येथील शिवमंदिराच्या ठिकाणी 12, फागली येथे पाच तर कृष्णानगर येथील दोन मृतदेह सापडले आहेत, सोमवारी कोसळलेल्या शिवमंदिरात अजूनही 10 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बुधवारी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील , असे शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) आणि लष्करासह पोलीस आणि एसडीआरएफने सकाळी 6 च्या सुमारास समर हिल येथे पुन्हा बचाव कार्य सुरू केले असल्याचे, शिमल्याचे उपायुक्त आदित्य नेगी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे

हवामान खात्याने मंगळवारी (15 ऑगस्ट) ऑरेंज अलर्ट जारी केला होता. पुढील चार दिवस म्हणजेच 19 ऑगस्टपर्यंत हवामान खात्याने हिमाचलक प्रदेश आणि उत्तराखंडला यलो अलर्ट दिला आहे.  मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश विद्यापीठाने 19 ऑगस्टपर्यंतचे सगळे शैक्षणिक उपक्रम स्थगित केले आहेत. विद्यापीठाचे ग्रंथालयही २० ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. तथापि, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नेहमीप्रमाणे विद्यापीठात उपस्थित राहतील, असे विद्यापीठाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.