एका वर्षात 66 हजार हिंदुस्थानींनी स्वीकारले अमेरिकेचे नागरिकत्व

‘देश आगे बढ रहा हैं’, ‘विकसित भारत’ अशा कितीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार देत असल्या तरी गेल्या काही वर्षात हजारो नागरिक चांगले शिक्षण, नोकरी आणि उद्योगाच्या शोधात विदेशात स्थायिक होत आहेत. 2022 या एका वर्षात तब्बल 66 हजार हिंदुस्थानी नागरिकांनी अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व स्विकारल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालानुसार अमेरिकेचे नारिकत्व घेणाऱयांमध्ये पहिल्या क्रमांकावर मेक्सिकन आहेत. तर दुसऱया क्रमांकावर हिंदुस्थानी नागरिक आहेत. 2022 मध्ये 1 लाख 28 हजार 878 मेक्सिकन नागरिकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारले. त्यानंतर 65,960 हिंदुस्थानी आहेत. तिसऱया क्रमांकावर फिलिपीन्सचे 53,413 नागरिक, क्युबा 46,913, डॉमिनिकन रिपब्लिक 34,525, व्हिएतनाम 33,246 आणि चीनच्या 27,038 नागरिकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारले.

28 लाखांवर हिंदुस्थानी
सीआरएसच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत स्थायिक झालेल्या हिंदुस्थानी नागरिकांची संख्या 28 लाख 31 हजारांवर आहे. मेक्सिकन नागरिक 1 कोटी 6 लाखांवर तर चीनचे नागरिक 22 लाख 25 हजारांवर आहेत.