
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
पावसाळा सुरू होऊनही मराठवाड्यात अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होत असून विजा कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. गुरुवारी एकाच दिवशी विजा कोसळून विभागात सातजणांचे बळी गेले आहेत. एकट्या नांदेड जिल्ह्यात कंधार, देगलूर आणि किनवट तालुक्यात दोन भावंडांसह चारजणांचा मृत्यू झाला असून धाराशीव जिल्ह्यात दोन महिला वीज पडून दगावल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील जळकोटमध्येही एका विद्यार्थ्याचा विजेने बळी घेतला आहे.
नांदेड जिल्ह्यात मुखेडजवळ कंधार तालुक्यात पेठवडज ग्रामपंचायत हद्दीतील चुडाजीचीकाडी येथे विक्रम उद्धव मुंडकर (२७) याचा वीज पडून मृत्यू झाला. देगलूर तालुक्यात केदारकुंठा येथे शेतकरी मारोती केशवराव बाराळे (५०) हे शेतात काम करत होते. दुपारी साडेचारच्या सुमारास वीज पडून मारोती यांचा मृत्यू झाला. किनवटजवळ मलकापूर तांडा येथे सायंकाळी सहा वाजता पाऊस आला. तेव्हा शेतात काम करताना दोन भावंडांचा झाडाखाली आश्रयाला बसले असताना वीज पडून मृत्यू झाला. हेमंत जाधव (१०) व शालिनी जाधव (८) अशी या मृत भावंडांची नावे आहेत. धाराशीव तालुक्यातील वाणेवाडी शिवारात शेतात काम करत असताना दुपारी दीड वाजता अचानक वीज कोसळून शालूबाई पकार (५०) व शीतल घुटुकडे (३२) यांचा मृत्यू झाला. लातूरच्या जळकोट तालुक्यातील डोंगरगाव येथे आश्रमशाळेत दहावीत शिकणारा वसीम हसन भांडे (१६) याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तालुक्यातील चेरा, शेलदरा व बोरगाव परिसरात वीज कोसळल्याने तीन जनावरे दगावली आहेत. औसा तालुक्यात फत्तेपूर, निलंगा तालुक्यात वलांडी, बोटकूळ, राठोडा येथेही वीज पडून जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत.































































