सिंधुदुर्गात 71 हजार गणेश मूर्तींची स्थापना; मुंबई -गोवा महामार्गाच्या कूर्मगती कामाबद्दल चाकरमानी नाराज

सिंधुदुर्गात 21 ठिकाणी सार्वजनिक तर 71 हजार 789 ठिकाणी घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शंभर वर्षाहून अधिक वर्षे झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सावंतवाडी शहरात असून पन्नास वर्षाहून अधिक गणेशोत्सव सार्वजनिक मंडळे उत्सव साजरा करतात. गणेश चतुर्थी निमित्त सारख्या कोकणात आनंदमय वातावरणात निर्माण झाले आहे. मुंबई गोवा चौपदरी महामार्गावरील खड्ड्याचे दिव्य पार करत चाकरमानी गावात दाखल होत आहेत. तर कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या उशिराने धावत असल्याने काहीजण मिळेल त्या वाहनांने कोकणात दाखल झाले आहेत.

गौरी गणपती सणाच्या निमित्ताने रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांची गर्दी केली आहे गौरी गणपती सणाच्या निमित्ताने चाकरमानी आपापल्या गावी आले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर गाड्या चार ते पाच तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी गाड्या आणि विशेष गाड्या यांचा ताण रेल्वे मार्गावर पडल्याने चार ते पाच तास रेल्वे उशिराने धावत आहेत. रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवासी कंटाळून गेले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कणकवली , सावंतवाडी कोकण रेल्वे स्थानकापर्यंत रस्ते पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी कामे सुरू केली आहेत. सावंतवाडी मळगाव रोड रेल्वे स्थानक मार्गावर खड्डे भरून खडी टाकल्याने गैरसोय होत आहे. सणासाठी गावात येणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठेकेदार व बांधकाम विभागाने प्रयत्न केले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकापर्यंत रस्ते पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर काही तरी काम सुरू झाले आहे असे दाखविण्याच्या नादात ठेकेदार व बांधकाम विभागाने गणेश भक्तांची गैरसोय केली आहे. रेल्वे स्थानकात येणाऱ्या गाड्या, रिक्षांना त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. तसेच खडी वाटेवर टाकून ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या गणेशभक्तांचे मुंबई गोवा महामार्गावर मेगा हाल झाले. पनवेल ते इंदापूर हे केवळ दोन तासांचे अंतर पार करायला आठ तासांचा कालावधी लागला. माणगाव, इंदापुर, कोलाड, वाकण या ठिकाणी डायव्हर्शनमुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. मंत्र्यांनी दिलेली अश्वासन फोल ठरल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनामार्फत गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची एक लेन सुस्थितीत करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्या प्रमाणे खड्डे मुक्त रस्ता तयार झाला असला तरी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना चाकरमानी गणेशभक्तांचे हाल झाले.

पुणे मुंबई द्रुतगती मार्गही मंदावला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर पडले आहेत. परिणामी द्रुतगती मार्गावर याचा ताण आलाय. वाहनांच्या वाढलेल्या संख्येनं बोरघाटात मार्ग मंदावला. मात्र जुन्या महामार्गावर वाहतूक कमी होती.खंबाटकी घाटात अनेक ठिकाणी वाहने बंद पडली .या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव व ईद हे दोन्ही सण एकाच कालावधीत असल्यामुळे दोन्ही धर्मांच्या बांधवांनी शांततेत व सुरळीत हे सण साजरे करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.