विहिरीत पडल्याने आठ वर्षीय चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सेलगाव

बहिणीसोबत शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय चिमुकलीचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथे 4 जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली. मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव विश्वश्री संजय कान्हुले (8) असे आहे.

बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील संजय कान्हुले हे आपल्या कुटूंबासह शेतात राहतात. आज संजय कान्हुले यांची मोठी मुलगी भाग्यश्री संजय कान्हुले (14) हिच्यासोबत लहान बहिण विश्वश्री संजय कान्हुले ही शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या असता भाग्यश्री ही पाणी शेंदत असतांना तिची नजर चुकवून विश्वश्री ही विहिरीत डोकावून पाहत असतांना तिचा तोल जाऊन ती विहिरीत कोसळली. ही बाब भाग्यश्रीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केला. परंतु आजु-बाजुला कोणी नसल्याने तोपर्यंत विहिरीत पाणी जास्त असल्याने विश्वश्रीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नंतर गावकऱ्यांनी व शेतातील लोकांनी विहिरी धाव घेवून विहिरीतून विश्वश्रीचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे सेलगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.