भाजपमध्ये निष्ठावंताना डावलून बाहेरून येणाऱ्यांना मानाचे पान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सांगली

भारतीय जनता पक्षामध्ये मूळच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून अन्य पक्षांतून भाजपात येणाऱ्यांना मानाचे पान व महत्त्वाची पदे देण्याचा सपाटा लावला आहे. यावरून भाजपातील जुना-नवा असा वाद उफाळला आहे. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. श्रीपाद अष्टेकर यांनी भाजप काँग्रेस- राष्ट्रवादीत विलीन झाली असल्याची बोचरी टीका करीत भाजपला घरचा आहेर दिला.

भाजपची अवस्था तंबूत शिरलेल्या उंटासारखी झाली आहे. आयारामांच्या वाढत्या संख्येमुळे पक्षाचे काँग्रेसीकरण झाले आहे. पक्षवाढीसाठी नव्या कार्यकर्त्यांना प्रवेश द्यावा लागतो; पण निष्ठावंत जुने बाहेर व नवे आयाराम आत ही परिस्थिती न समजण्यासारखी आहे. आमच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट व निवडणूक लढविण्याइतका पैसा नाही, हे आम्ही समजू शकतो. पण, देशातील सगळ्यात श्रीमंत पक्ष असणाऱ्या भाजपने अशा निष्ठावंतांना निवडणुकीस साहाय्य करण्यास काहीच हरकत नाही. ज्या ठिकाणी सिलेक्टिव्ह संधी आहे, तेथेही जुन्यांना संधी मिळत नाही.

पक्ष सदस्य नोंदणी, आंदोलन या जबाबदाऱ्या जुन्या निष्ठावंतांवर टाकल्या जातात. पक्षाचे धोरण व भाजप म्हणून विचार याची मोहीम किती जणांनी राबविली? किती नव्या नेत्यांच्या कार्यालयात दीनदयाळ श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलजी, आडवाणी यांच्या प्रतिमा आहेत? असे प्रश्न अष्टेकर यांनी उपस्थित केले आहेत. केंद्र व राज्यातील सत्तेचा दुरुपयोग करून अनुदान व कंत्राटे मिळवून संपत्ती जमा करणे व बेकायदेशीर कृत्यांना सत्तेतून अभय मिळविणे हा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी जुन्या निष्ठावंतांची बैठक झाली. पक्षप्रवक्ते माधव भंडारींनी या बैठकीला भेट दिली; पण त्याला अपेक्षित प्रतिसाद नव्हता. त्यानंतरही काही फरक पडला नाही. हे अजून किती दिवस चालणार? पक्षशिस्त म्हणून आम्ही याबाबत जाहीर वाच्यता केली नाही; पण आता सहनशक्ती संपली आहे. आता आम्ही जाहीरपणे बोलणार असून, निष्ठावंतांचे एकत्रीकरण सुरू झाले आहे. पक्ष उभारणी व सत्तेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपला बळी दिला, त्या पायऱयांवरून मंत्री, पदाधिकारी, सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचले. आता त्यांना खालचे काही दिसेनासे झाले आहे. संघाचे संस्कार होऊनही हे कृतघ्न कसे काय झाले? अजूनही वेळ गेलेली नाही. नवे पाहुणे आपल्या सोबत राहतीलच असे वाटत नाही.

एखाद्या वेळी त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास हे लोक गठ्ठय़ाने बाहेर पडतील, तेव्हा हात चोळत बघत बसण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यांच्या पलायनानंतर आमच्यासारख्यांची आठवण येऊन काही फायदा नाही; कारण सर्व निष्ठावंतांनी आपल्याला रामराम ठोकलेला असेल.

पक्षांतर नाही तर घरात गप्प बसणेच शांती व समाधानाचा मार्ग असेल. आता काँग्रेस कमिटीलाच भाजपचा बोर्ड लावणे बाकी आहे. अशा भ्रामक सत्ता परिवर्तनाचा काय उपयोग? भाजपचे असेच काँग्रेसीकरण सुरू राहिले तर पुन्हा जनसंघाचे पुनर्जीवन करावे लागेल, असे अष्टेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे