
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल आज तिसऱया मुंबईत गेली. नवी मुंबईला उरणशी जोडणाऱया नेरूळ ते खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज झाले. उद्यापासून या मार्गावर 40 फेऱया चालवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या लोकलला हिरवा झेंडा दाखवला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाला आणि जेएनपीटीला जोडणाऱया या मार्गामुळे भविष्यातील तिसऱया मुंबईचा विकास जोमाने होणार असल्याचे स्पष्ट केले. येथील जुन्या खदाणींवर एक लाख घरे बांधण्याची योजना असून रेल्वेपासून जवळ प्रकल्पग्रस्तांना घरे मिळणार असून गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’साठी लवकरच नोटिफिकेशन काढण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली.
याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, श्रीरंग बारणे, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
पेण ते अलिबाग रेल्वे सुरू करावी – अनंत गीते
पेण माझ्या मतदारसंघात येत असल्याने येथील सेवांसाठी रेल्वेकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मध्य रेल्वेचे रोह्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे रोह्यापर्यंत चालवावी तसेच पेण ते अलिबाग रेल्वेचा आराखडाही तयार असून आरसीएफच्या मार्गाच्या हस्तांतरासाठी केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी मान्यता दिल्याने अलिबाग रेल्वे मार्ग सुरू करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी यावेळी केली.
लोकलकळा सहन करणाऱया चाकरमान्यांसाठी…
पनवेल रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून पनवेल ते सीएसएमटी एलिवेटेड फास्ट कॉरिडॉरलाही मान्यता देण्यात आली.
नेरूळ ते खारकोपर रेल्वेचा पुढचा उरणपर्यंतचा टप्पा पुढच्या वर्षी सुरू होणार असून मध्य रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरणही पुढच्या वर्षी पूर्ण होईल. पनवेल कोचिंग डेपोचे काम लवकरच पूर्ण होणार असून हार्बरचा तिसरा आणि चौथा मार्ग त्यास जोडण्यात येईल.
मुंबई ते उरण अंतर किती कमी होणार
गेट वे ते उरण समुद्रमार्गे – 34 समुद्री मैल – 1 तास 25 मिनिटे
रस्तेमार्गे मोटारीने अंतर – 48 कि.मी. – दोन तास
नेरूळ ते खारकोपर (टप्पा-1)- 12 कि. मी. – 20 ते 35 मिनिटे
नेरूळ ते उरण (टप्पा-2 ) – 27 कि.मी. – 35 ते 40 मिनिटे































































