
सतीश राजवाडे…मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिग्दर्शक. कॉलेजच्या एकांकिका, व्यावसायिक रंगभूमी आणि छोटा पडदा आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवल्यानंतर लेखक–दिग्दर्शक म्हणूनही त्याने स्वतःला सिद्ध केले. अभिनयापेक्षा मला गोष्ट सांगायला जास्त आवडते असे तो सांगतो. आगामी ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ या सिनेमांनिमित्त त्याच्याशी मारलेल्या गप्पा…
‘मुंबई-पुणे-मुंबई 3’बद्दल काय सांगशील?
– एखाद्या मराठी सिनेमाचा तिसरा भाग येण्याची ही पहिलीच वेळ. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. गौतम आणि गौरीच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ‘मुंबई-पुणे-मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, पण दुसऱया भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे हे मात्र जाणवले. ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ चित्रपटाच्या कथेबद्दल आताच काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की, हा तिसरा भागही प्रेक्षक तितकाच डोक्यावर घेतील.
अभिनयापेक्षा तू दिग्दर्शनात अधिक रमलेला दिसतोस. तुला अभिनय करायला आवडते की दिग्दर्शन?
– अभिनय ही माझी आवड असली तरी मी दिग्दर्शनात जास्त रमतो. मला गोष्ट सांगायला फार आवडते. माझे आई-बाबा रेल्वेत कामाला होते. या क्षेत्राशी माझा फार काही संबंध नव्हता. कॉलेजमध्ये एकांकिका करता करता मी पुढे व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले. ज्यावेळी मी एडिटिंग शिकलो त्यावेळी गोष्ट सांगण्यात खूप मजा असते हे माझ्या लक्षात आले. आजही मला अभिनयाच्या ऑफर येतात. मात्र माझा फार कल अभिनयाकडे नाही.
पुन्हा रंगभूमीवर काम करायला आवडेल का?
– अठरा वर्षांपूर्वी मी ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे तब्बल 890 प्रयोग केले आहेत. आजही चांगली ऑफर आली तर मला नाटकात काम करायला नक्कीच आवडेल. पडदा बाजूला सरकल्यानंतर प्रेक्षकांनी भरलेल्या सभागृहात सर्वांसमोर संवाद म्हणणे वाटते तितके सोपे नाही, परंतु रंगभूमीवर काम करण्याची मनापासून इच्छा आहे.
मराठी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होते तेव्हा एकच निर्माता असतो, परंतु रीलिजपर्यंत पोस्टरवर चार निर्मात्यांची नावे झळकतात. असे का?
– आपल्या निर्मात्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आहे असे नाही, पण काही निर्मात्यांमध्ये अभ्यास मात्र कमी आहे. फार कमी निर्माते अभ्यास करून सिनेमाची निर्मिती करतात. माझ्याकडे आज 10 रुपये आहेत म्हणून मी त्यात सिनेमाची निर्मिती करतो असे म्हणून चालत नाही. सिनेनिर्मिती हा व्यवसाय आहे. प्रत्यक्ष निर्मितीवेळी निर्मिती खर्च 10 रुपयांवरून 11 रुपयेदेखील होऊ शकतो. हे काही निर्मात्यांना माहीतच नसते. त्यामुळे ऐनवेळी निर्मात्यांना आपला सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतर निर्माते शोधावे लागतात.
तुझ्या स्ट्रगलच्या दिवसांविषयी काय सांगशील?
– पहिल्या सिनेमाला तब्बल 23 पुरस्कार मिळूनही साडेचार वर्षे माझ्याकडे कुठलेही काम नव्हते. त्यावेळी सिनेमांची निर्मिती कमी व्हायची, मराठी वाहिन्यादेखील मर्यादित होत्या. काम मागायचे तरी कुठे, असा प्रश्न होता.पुढे हे चित्र बदललं. सिनेमांची आणि मराठी वाहिन्यांची संख्या वाढली आणि कर्म-धर्मसंयोगाने मला चांगले काम मिळत गेले.



























































