सिग्नेचर ब्रिज बनतोय मृत्यूचा सापळा, 24 तासात तिघांचा अपघाती मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी उद्घाटन केलेला सिग्नेचर ब्रिज मृत्यूचा सापळा बनत आहे. गेल्या 24 तासांत अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी झालेल्या दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. शुक्रवारी देखील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मेडिकलच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.

शनिवारी सकाळी दोन व्यक्ती स्पेंडर दुचाकी घेऊन नांगलोईकडून उत्तरेकडे जात होती. यावेळी सिग्नेचर ब्रिजवर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. शंकर (24) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो गाझियाबादचा रहिवासी होता, तर त्याचा भाऊ दीपक (17) हा गंभीर जखमी झाला आहे, तो शालीमार बागचा रहिवासी आहे. या अपघाताची माहिती तिमारपूर पोलीस स्थानकाला साडे आठच्या दरम्यान मिळाली. यानंतर पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शंकरला मृत घोषित केले, तर दीपकवर उपचार सुरू आहेत. मृत शंकर हा सेल्समन म्हणून काम करत होता.

याआधी शुक्रवारी सिग्नेचर ब्रिजवर असाच एक अपघात झाला होता. सिग्नेचर ब्रिजवरील डिव्हायडरला धडकून दुचाकी 30 फूट खाली कोसळली. यात डॉक्टर सत्यविजय शंकरन (25) आणि चंद्रशेखर (23)यांचा मृत्यू झाला.