अखेर मोदी बोलले, म्हणून होतोय राममंदिर उभारायला विलंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपुर 

अयोध्येतील राममंदिर उभारण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस धोकादायक राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदी यांनी प्रथमच राममंदिराच्या मुद्द्यावर मौन सोडत भाष्य केले आहे. न्यायालय अयोध्येतील वादावर जनतेची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेस नेते महाभियोग आणण्याची भीती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दाखवत आहेत. राजस्थानमधील अलवार येथे प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर हल्ला चढवत काँग्रेसच्या धोकादायक आणि जातीयवादी राजकारणामुळे राममंदिराला विलंब होत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अयोध्या मुद्दा उचलल्यानंतर पहिल्यांदाच मोदी यांनी राममंदिर प्रकरणी वक्तव्य केले आहे.

राम मंदिराची सुनावणी प्रलंबित ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ही सुनावणी लोकसभा निवडणुकीनंतर घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यातून काँग्रेसची मानसिकता दिसून येते, असे मोदी म्हणाले. राज्यसभेतील संख्याबळाचा वापर करून या प्रकरणाचा निकाल आपल्याबाजूने वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकावण्याचे काम करत आहेत. न्यायाधीशांनी काँग्रेसच्या राजकारणाला घाबरू नये असे आवाहनही त्यांनी केले. न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची काँग्रेसची खेळी जुनीच आहे असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.