
उदय जोशी । प्रतिनिधी
माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या दलितांना मी फोडून काढते, जे अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी येतात त्यांना मी जास्त मारते’, असे धक्कादायक वक्तव्य करणाऱ्या भाग्यश्री नवटके यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हायरल व्हिडीओमुळे नवटकेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
माजलगावच्या पोलीस उपाधिक्षक भाग्यश्री नवटके यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडीओमुळे संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत त्यांनी धक्कादायक आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘तुम्ही मराठा आहात म्हणून मी केवळ तुमच्या पाठीवर मारते जर दलित असतात तर मी त्यांना फोडून काढले असते. एका प्रकरणामध्ये अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल होता. त्यातील आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मी त्याला कशी मदत केली आणि दलितांना कसा धडा शिकवला’, असे त्या व्हिडीओमध्ये नवटके बोलत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विविध दलित संघटनांनी कार्यवाहीची मागणी केली आहे. बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनीही पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास आपण कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला. तर रिपाईचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनीही आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून माजलगाव येथे कार्यरत असलेल्या भाग्यश्री नवटके यांनी माजलगाव उपविभागात आपली छाप सोडली आहे. मात्र या व्हिडीओमुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.





























































