
सामना ऑनलाईन । पुणे
काही काळापूर्वी आयर्लंडमधील एका गाढवाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. त्या व्हिडीओत एक गाढव हाँ हाँ असा आवाज करण्याऐवजी चक्क गात होतं. इंटरनेटवर त्याला तुफान प्रसिद्धी मिळाली. आता पुण्यातलं एक गाढवंही त्याच्या गाण्यामुळे चांगलंच लोकप्रिय होताना दिसत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानसार, पुण्यातील एका प्राणिसाहाय्य केंद्रातलं एक मादी गाढव आनंद झाला की चक्क गाणं गातं. काही महिन्यांपूर्वी गर्भवती असलेलं एक मादी गाढव रस्त्यावर अतिशय बिकट परिस्थितीत सापडलं होतं. पुण्यातील रेस्क्यू या प्राणिमित्र संस्थेने या गाढवाला त्यांच्या संस्थेत आणून त्याचं नाव एमिली असं ठेवलं. एमिलीने रस्त्यावरच एका पिल्ला जन्म दिला होता, मात्र ते जगलं नाही. अतिशय नाजूक शारीरिक आणि मानसिक अवस्थेत असलेली एमिली पिल्लू मेल्यानंतर अतिशय आक्रमक झाली होती. ती कुणालाही जवळ फिरकू देत नव्हती.
खूप प्रयत्नांनंतर रेस्क्यू संस्थेने एमिलीला शांत करून तिच्यावर उपचार केले. आता मात्र, एमिली पूर्णपणे बदलली आहे. ती तिच्या सवंगड्यांसोबत खेळते. विशेष म्हणजे तिला खादाडी प्रचंड प्रिय असून तिचा आवडता खाऊ तिला कुणी दिला तर ती खुशीत येऊन चक्क गायला सुरुवात करते. या मागे कोणतंही शास्त्रीय कारण देता येत नाही. पण जेव्हा तिला आनंद होतो, तेव्हा ती रेकण्यासोबत गाऊही लागते, असं तिला सांभाळणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ भलताच व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ-


























































