गुरुवारपासून काँग्रेसची राज्यव्यापी ‘जनसंघर्ष यात्रा’, असा असेल कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा गुरुवारपासून नागपूर विभागात सुरु होणार आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे.

जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि अमरावती विभागाचे चार टप्पे जनतेच्या प्रचंड प्रतिसादासह पूर्ण झाले आहेत. गुरुवारी 10 जानेवारीला रोजी सकाळी 10 वा. दिक्षाभूमी, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्यानंतर ताजबाग आणि गणेश टेकडी येथे दर्शन घेऊन जनसंघर्ष यात्रेचा नागपूर विभागातील प्रवास सुरु होईल. दुपारी 12 वा. कामठी येथे जनसंघर्ष यात्रेचे भव्य स्वागत होणार असून दुपारी 2.30 वा. रामटेक येथे पहिली जाहीर सभा होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वा. तुमसर जि. भंडारा येथे यात्रेचे भव्य स्वागत होणार असून सायंकाळी 6 वा. तिरोडा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. गोंदिया, दुपारी 2 वा. सडक अर्जुनी तर सायंकाळी 4 वा. साकोली जि. भंडारा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. भंडारा, दुपारी 2.15 वा. चिमूर जि. चंद्रपूर येथे जाहीर सभा होणार आहेत तर सायंकाळी 5 वा. वरोरा येथे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत होणार असून सायंकाळी 6 वा. चंद्रपूर येथे रॅली व जाहीर सभा होणार आहे.

रविवार 13 जानेवारी रोजी सकाळी 1.30 वा. गडचिरोली, दुपारी 2 वाजता ब्रम्हपुरी येथे जाहीर सभा होणार असून जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याची सांगता सभा सायंकाळी 6 वाजता नागपूर येथे होणार आहे.