
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
उत्तर प्रदेशात वाराणसी, अमेठी, रायबरेली, लखनऊ असे असंख्य लोकसभा मतदारसंघ हे दिग्गज राजकीय नेत्यांचे आहेत. पण तिथून लढणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसपा नेत्या मायावती, सपा नेते अखिलेश यादव यांच्यासारख्या अनेकांना या वेळी आपल्या मतदारसंघात ‘मयत’ उमेदवारांशी झुंजावे लागणार आहे.
उत्तर प्रदेशात ‘जिवंत’ असूनही महसूल खात्याने ‘मृत’ म्हणून नोंद केलेल्या इतरांना ‘मयत’ घोषित करण्याचे प्रकार तिथे सर्रास घडतात. त्यामुळे लालबिहारी यांनी ‘मृतक संघ’ ही संघटना स्थापन केली. ती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. खुद्द लालबिहारी यांना 1977 सालात महसूल खात्याने ‘मयत’ म्हणून घोषित केले होते. आपण जिवंत आहोत, हे सिद्ध करण्यासाठी लालबिहारी यांनी अनेकदा निवडणूक लढवली. तेव्हा कुठे सरकारने ते जिवंत असल्याचे 1994 सालात मान्य केले. महसूल खात्याने ‘मयत’ म्हणून घोषित केलेल्या अनेक जणांना ते जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपण उमेदवार बनवणार आहोत, असे लालबिहारी यांनी सांगितले.


























































